मुंबई ते नांदेडदरम्यान धावणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीचे फिल्मी स्टाइलने अपहरण झाले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासात आरोपीला अटक करण्यात आली असून मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.
रविवारी सकाळी कल्याण येथून रामेश्वर माधव केंद्रे आपल्या कुटुंबियासोबत तपोवन एक्स्प्रेसने परभणीला येण्यासाठी निघाले होते. मनमाड येथे तपोवन एक्सप्रेस सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचली. त्यावेळी त्यांनी मुलगा व मुलीस लघुशंकेसाठी डब्यातील स्वच्छता गृहाजवळ नेले. चिमूकली स्वच्छतागृहामधून बाहेर येऊन उभी राहिली असताना संधी साधून आरोपी महिलेने या चिमुकलीस पळवू नेले.

आरोपी महिलेने ईश्वरी (वय ४) हिला स्वताकडे असलेल्या चादरीमध्ये लपवत अवघ्या काही मिनिटात ५ चे ६ डब्बे पास करून पळ काढला.
मुलास स्वच्छता गृहातून बाहेर आणल्यानंतर मुलगी दिसेनाशी झाल्यामुळे मुलीची आई मुक्ता केंद्रे यांनी आरडाओरडा केला. सदर घटनेची माहिती ही रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग रेल्वे पोलीस औरंगाबाद यांना देण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद रेल्वे स्थानकावर लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी आरोपी महिला अनामिका मान्झी ( वय ४० ) देहरी, जि. रोहता झारखंड हिला अटक केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी औरंगाबादमध्ये अपहरणचा गुन्हा नोंदवला आहे. चिमुकलीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.