News Flash

पक्षांतर केले; कोंडीत अडकले!

नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्याशी बिनसल्याने अनेकांनी भाजपचा रस्ता धरला.

पक्षांतर केले; कोंडीत अडकले!

|| सुहास सरदेशमुख

घुसमटणाऱ्या नेत्यांची संख्या नांदेडमध्येच अधिक

औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपमधील घाऊक पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांची आता पुरती कोंडी झाली आहे. सत्ताधारी पक्षात कशीबशी संधी मिळेल या आशेवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची अवस्था ‘ना इकडे ना तिकडे’ अशी झाली आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात ही संख्या सर्वाधिक आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या दिग्गज नेत्यांचा आता मानपानही राखला जात नसल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत.

भास्करराव खतगावकर पाटील, सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर, ओमप्रकाश पोकर्णा, बापुसाहेब गोरठेकर, गंगाधरराव कुंटुरकर, अविनाश घाटे या नेत्यांनी पक्ष बदलला. आता बहुतांश जणांची कोंडी झाली आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांना फक्त पक्षांतरानंतर यश मिळाले. केवळ भाजपमध्ये नाही तर शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या जयदत्त क्षीरसागरसारख्या नेत्यांची अवस्था सत्ता असताना वळचणीला अशी झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्याशी बिनसल्याने अनेकांनी भाजपचा रस्ता धरला. भाजपने या नेतेमंडळींना आधी ताकद दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांचा पराभव झाल्याने हे सारे विरोधक आनंदात होते. पण विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात चव्हाणांची सरशी झाली. त्यातच मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांचे राजकीय वजन पुन्हा वाढले.

नांदेड जिल्ह्यात बऱ्याच दिग्गजांना डावलून १९८० पासून विधान परिषदेवर भाजपकडून कोणाला संधी नव्हती, ती राम पाटील रातोळीकरांना मिळाली. अन्य सारे जण आपल्यालाही संधी मिळेलच या आशेवर होते. त्यातील काहींनी आता अशा सोडून दिली आहे. बीड जिल्ह्यात भाजपशी जवळीक साधून शिवसेनेत प्रवेश करणारे जयदत्त क्षीरसागर यांचीही घुसमट सुरू आहे. सेनेचा मोठा नेता आल्यावर व्यासपीठाच्या खाली कुठे तरी ते बसतात. हजेरी लावतात आणि निघून जातात. राष्ट्रवादीत धनंजय मुंडे यांना महत्त्व मिळत गेल्याने जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेने त्यांना लगेचच कॅ बिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले. परंतु विधानसभा निवडणुकीत पुतण्यानेच त्यांचा पराभव केला. परिणामी क्षीरसागर मागे पडले.

रमेश आडसकर यांची भाजपमध्येही अशीच स्थिती आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी लढत चांगली दिली. पण ते पराभूत झाले. त्यांचीही भाजपमध्ये अशीच कोंडी झाली. शेवटी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत. भाजपमध्ये गेलो आणि पश्चात्ताप झाला अशी भावना असणारे अनेक नेते मराठवाड्यात आहेत.

उस्मानाबादमधील नेते राणा जगजितसिंह पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पण सत्ता आली महाविकास आघाडीची. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला त्यांच्या समर्थकांनी त्यांना दिला, पण शरद पवार यांनीच त्यांच्यासाठी दार बंद असल्याचे सांगितले. पक्षांतर केल्यानंतर लाभ मिळणारे नेते कमी आणि कोंडीत अडकलेलेच अधिक असे चित्र मराठवाड्यात आहे.

वाचाळपणामुळे कोंडी

कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले तानाजी सांवत यांची सध्या कोंडी असल्याचे त्यांचे समर्थक-कार्यकर्ते आवर्जून सांगतात. तानाजी सावंत यांनी मातोश्रीवर नव्याने मंत्रिपद मिळावे म्हणून विरोधात वक्तव्य केले. परंडा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची पक्षातच कोंडी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:01 am

Web Title: lok sabha and vidhan sabha elections bjp congress election akp 94
Next Stories
1 औरंगाबादकर सुसाट!
2 शासकीय रुग्णालयातील हजारांवर पदे रिक्त
3 पेरणी तूर्त तरी नकोच! कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
Just Now!
X