‘एमआयएम’चे इम्तियाज जलील विजयी

औरंगाबाद : पाणी प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, त्यात कचऱ्याच्या समस्येची पडलेली भर यामुळे औरंगाबादकर शिवसेनेच्या कारभाराला वैतागले होते. महापालिकेतील कामाचे सारे अपयश चंद्रकांत खरे यांच्यामुळे असल्याचे चित्र त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी निर्माण केले. त्याला जातीची किनार लावण्यात आली. मराठा मतांचे ध्रुवीकरण व्हावे, या प्रयत्नांना खतपाणी घालण्यात आले. परिणामी खासदार चंद्रकांत खरे यांचा पराभव झाला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खरे यांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव कार्यकर्त्यांंसमवेत घुसले होते. वाद होऊ नयेत म्हणून त्यांना वाट करून देण्यात आली. त्यांनी गुलमंडीवर सभा घेतली तेव्हा कार्यकर्त्यांची तशी गर्दी नव्हती. मात्र, नंतर हर्षवर्धन जाधव यांची मराठा समाजाचा खराखुरा चेहरा अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी दिलेला राजीनामा आणि क्रांती मोर्चामध्ये आरक्षणासाठी घेतलेला पुढाकार यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही खासे प्रयत्न केले. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद या मतदारसंघात या प्रतिमेला प्रतिसाद मिळत गेला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांना दोन लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली. एका बाजूला शहराच्या विकासासाठी चंद्रकांत खरे फारसे प्रयत्न करत नाहीत, असा मतदारांपर्यंत गेलेला संदेश, त्यातून निर्माण झालेला रोष वाढत होता. दुसरीकडे मराठा मतांचे ध्रवीकरण होत होते. त्याच वेळी औरंगाबादमध्ये दलित- मुस्लिम मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग सुरू करण्यात आला.

तत्पूर्वी ‘एमआयएम’ हा लोकशाही मानणारा पक्ष असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यानंतर अ‍ॅड्. ओवेसी यांनी अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिले आणि बहुजन वंचित आघाडीमध्ये एमआयएमचा समावेश झाला. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादमध्ये शक्तिप्रदर्शन झाले. भाजपची ‘बी’ टीम अशी टीका सर्वत्र होत असली तरी ग्रामीण आणि शहरी भागातील दलित संघटित होत होता. औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघात भाजप-सेनेच्या वादामुळे निवडून आलेले आमदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा कार्यकर्ता जोडला. ते फुटू नयेत म्हणून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले आणि गुरुवारच्या मतमोजणीमध्ये त्यांना तीन लाख ८९ हजार ४२ मते मिळाली आणि इम्तियाज जलील खासदार झाले. हे सारे घडत असताना काँग्रेसला उमेदवार सापडत नव्हता. काँग्रेस प्रदेशाध्यक्षच गोंधळात टाकणारे निर्णय घेत होते. काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणारे आणि निर्णय घेणारे नेते अब्दुल सत्तार होते. ते प्रदेशाध्यक्षांना अधिक गोंधळात टाकत होते. त्यांनी स्वत:हून उमेदवारी तर नाकारली वरून पक्ष कार्यालयातील खुर्च्यासुद्धा उचलून नेल्या. त्यामुळे काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे ‘लक्ष्मीपुत्र’ असा निकष मानून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली गेली. परिणामी काँग्रेसच्या हाती काही लागणार नाही, हे स्पष्टच दिसत होते.

औरंगाबाद जिल्हय़ातील जातीचे ध्रुवीकरण हे पक्षनिरपेक्ष होती. जात हाच प्रमुख घटक म्हणून मतदान व्हावे, असे जाहीर आणि छुपे प्रयत्न भाजपमधून झाले तसेच ते शिवसेनेमध्ये झाले. शिवसेनेमध्ये जातीपातीचा विचार होत नाही, अशी धारणा या निवडणुकीपासून बदलली आहे. त्याला बळ मिळते की, त्यावर मात करणारी पाऊले उचलली जातात की नाही, यावर औरंगाबादच्या विधानसभेमध्ये शिवसेनेचे भवितव्य ठरणार आहे.

 

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

इम्तियाज जलील     ३८९०४२

चंद्रकांत खरे              ३८४५५०

हर्षवर्धन जाधव          २८३७९८

सुभाष झांबड              ९१७८९