औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रुम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरुवात होणार असून प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. साडेआठ वाजता सर्व ईव्हीएम मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून एकूण २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामध्ये मतदारसंघ क्रमांक (कंसात फेऱ्यांची संख्या)  कन्नड, (२६), औरंगाबाद मध्य (२४), औरंगाबाद पश्चिम (२५), औरंगाबाद पूर्व (२३), गंगापूर (२३), वैजापूर (२५) याप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आयोगाने विधानसभा मतदारसंघनिहाय  ब्रजमोहन कुमार व  देवेंद्र सिंग यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या मतमोजणी प्रक्रियेत १३० मतमोजणी सहायक, १३७ मतमोजणी पर्यवेक्षक, १३२ सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघासाठी १४ याप्रमाणे सहा मतदारसंघांसाठी ८४ टेबलवर २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर व्हीव्हीपॅट मधील मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे.

यावर्षी ४७७५ टपाली मतपत्रिका निर्गमित करण्यात आल्या असून आतापर्यंत २११२ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ९९२ सनिकांच्या मतपत्रिका असून उर्वरित मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिकांचा समावेश आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या अधिपत्याखाली सुमारे ३०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.