शहराच्या पश्चिम वळण रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून नागसेननगरमधील दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी मुलींच्या वडिलांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध छेडछाड करून मुलींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहरातील नागसेननगर येथे राहणारे प्रेस फोटोग्राफर गुणवंत भगत यांच्या सुचिता व सुप्रिया या दोन मुलींनी गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. या दोन्ही मुलींच्या आत्महत्येविषयी त्यांच्या वडिलांना शंका होती. त्यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांकडे एक तक्रार दिली होती. या तक्रारीत भगत यांनी नमूद केले होते, की माझी मुलगी सुचिता हिचा राजनगर येथील आरोपी चंद्रगुप्त युवराज मोरे हा सतत पाठलाग करून ओळख वाढविण्याचा प्रयत्न करीत असे, व आपण लग्न करू असे म्हणून नेहमी त्रास देत असे. तसेच दुसरी मुलगी सुप्रिया हिचा शहरातील रोशन रतन नवसागरे हा नेहमीच पाठलाग करून वाईट हेतूने त्रास देत असे. माझ्या दोन्ही मुली सुप्रिया व सुचिता यांना चंद्रगुप्त मोरे व रोशन नवसागरे यांच्याशी संबंध ठेवायचा नव्हता, तरीही ते दोघे सतत छेडछाड करीत व फोन करून त्रास देत होते. वरील दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गडीमे करीत आहेत.