औरंगाबादेतील छत्रपती नगरातील घटना

बीड बायपास मार्गानजीकच्या सातारा परिसरातील छत्रपती नगरात राहणारे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेकटा येथील शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांचा शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सकाळी घटनास्थळी पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, भरत काकडे यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला. संपर्ण घराची व परिसराची पाहणी केली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचेही पथक दाखल झाले होते.

जितेंद्र होळकर हे छत्रपतीनगरातील प्लॉट क्रमांक ३६ मध्ये राहतात. तेथील दुमजली घरात जितेंद्र होळकर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी असलेल्या पत्नी भाग्यश्री, मुलगा यश हे तिघे राहातात. होळकर यांची मुलगी साक्षी ही संगमनेरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. होळकर यांची एक वर्षांपूर्वीच पदोन्नतीने शेकटा येथील शाखेत व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली होती. शुक्रवारी मध्यरात्री जितेंद्र होळकर यांच्या घरात मुख्य गेटवरून दोन ते तीन मारेकरी शिरले. या वेळी होळकर हे एका खोलीत तर त्यांची पत्नी भाग्यश्री व मुलगा यश हे दुसऱ्या खोलीत झोपले होते. मारेकऱ्यांनी पत्नी व मुलगा झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावली व जितेंद्र होळकर यांच्या खोलीत शिरून त्यांचा गळा आवळला. होळकर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मारेकऱ्यांनी हातातील शस्त्राने वार करून त्यांचा गळा चिरला. या वेळी झालेल्या झटापटीच्या आवाजाने होळकर यांची पत्नी भाग्यश्री यांना जाग आली. त्यांनी मोबाईलवरून शेजाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शेजारचे येईपर्यंत मारेकरी पसार झाले होते. शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा जितेंद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर भाग्यश्री यांच्या बेडरुमला बाहेरुन कडी लावलेली होती. शेजाऱ्यांनी भाग्यश्री यांच्या खोलीच्या दरवाजाची कडी उघडून त्यांना बाहेर काढले. यानंतर घटनेची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भारत काकडे, गुन्हे शाखा निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सकाळी जितेंद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेण्यात आला. सायंकाळी जितेंद्र होळकर यांच्या पार्थिवावर नगर जिल्ह्य़ातील शेवगाव तालुक्यात कांबी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी स्थापन केलेले पथक कांबीसह शहरातूनही माहिती गोळा करीत आहे. सातारा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. पोलीस नेमकी हत्या कोणत्या कारणातून झाली आहे, याचा सर्वच अंगांनी तपास करीत आहे. त्यामध्ये  आर्थिक व्यवहार, बँकेतील काही कर्जाची प्रकरणे, सातारा परिसरात काही पारधी राहात असून त्यांच्याकडूनही असा काही प्रकार घडला आहे का, यासह इतरही अनेक अंगांनी चाचपणी करीत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.