प्रकृती चिंताजनक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

ऊसतोडीसाठी आई-वडिलांचे स्थलांतर झाल्याने भावासह आजीकडे राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. ही विद्यार्थिनी साठ टक्क्यांपेक्षा अधिक भाजली असून, तिच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील तरुणाने तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास नकार दिल्यामुळे तरुणासह चौघांनी हे कृत्य केल्याचा जबाब तिने दिला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यतील सोनवळा (ता. अंबाजोगाई) येथील प्रज्ञा उर्फ सोनाली सतीश मस्के (वय १७) ही लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथील महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आई-वडील ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाल्याने दोन भावांसह ती आजीकडे राहते. आठवडाभरापूर्वी गावातीलच महादेव जालिंदर घाडगे या तरुणाने प्रज्ञाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला, मात्र तिने नकार दिल्यानंतर २६ डिसेंबर रोजी प्रज्ञा घरामध्ये एकटी असल्याचे पाहून महादेव घाडगेसह अन्य तिघे जण तिच्या घरामध्ये घुसले. माझ्याशी लग्न करणार आहेस का, असा प्रश्न विचारल्यानंतर तिने स्पष्ट नकार दिला. त्याच वेळी चौघांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. जिवाच्या आकांताने तिने आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावत आले. त्यांनी प्रज्ञाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

प्रज्ञा ही साठ टक्क्यांपेक्षा अधिक भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाच्या माहितीनंतर पोलिसांनी तिचा इनकॅमेरा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणी महादेव घाडगे, बबन मस्के, कविता घाडगे, सुवर्णा मस्के या चौघांविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.