हिंगोली पोलिसांची कारवाई

एटीएम कार्डावरून बँक खात्यातील पसे परस्पर काढून घेणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एकाला ताब्यात घेण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. येथील लिंबाजी दौंड या शिक्षकाचे ३ लाख ७७ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याने त्यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारावरून पोलिसांना पसे काढणारी टोळी ताब्यात घेण्यात यश आले आहे.

येथील लिंबाजी दौंड या शिक्षकाची काही महिन्यापूर्वी बँक खात्यातून ३ लाख ७० हजाराची रक्कम परस्पर काढून घेतली गेली होती. दौंड यांनी शहर पोलिसात तशी तक्रार नोंदविली होती. शहरातील अनेकांना बँक खात्यासंदर्भात तसेच आधारकार्डाच्या नावाखाली मोबाईलवरून संदेश इतकेच नाही तर प्रत्यक्ष संवाद साधला जात होता अशा तक्रारी आहेत. दौंड यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मराळ यांनी सायबर क्राईमचा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रत्यक्ष तपासाला सुरूवात केली.

तपासात बँक खात्यातून ग्राहकांचे दिल्ली भागातील काही कंपन्यांच्या नावे पसे काढून घेतल्याचे आढळून आले. तेव्हा पोलिसांनी दिल्लीमध्ये ही टोळी पकडण्यासाठी एका पथकाद्वारे तपास सुरू केला असता या तपासात परितोष तारापद पोतदार (रा. एमव्ही १६ जि.मलकनगिरी राज्य ओरिसा) यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

मराळ यांनी सांगितले की, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही टोळी २ पद्धतीने काम करीत होती. एटीएम केंद्रावर कार्ड धारकारच्या पाठीमागे उभे राहून पासवर्ड पाहणे, किंवा कार्डावरील शेवटचे ८ क्रमांक घेणे ही माहिती दिल्ली येथे सहकाऱ्याला पाठविली जात होती.

नंतर तेथे तत्काळ बनावट एटीएम कार्ड तयार करून त्यावर शेवटचे आठ क्रमांक नोंदवून एटीएममधून पसे काढून घेतले जात होते. हा सर्व प्रकार केवळ एसबीआय बँक मध्ये वापरल्या जाणाऱ्या मास्टर कार्डबाबत केला जात होता. तसेच विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करून पसे काढले जात होते काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.

राज्यभरात ५० गुन्हे

अशा प्रकारच्या फसवणुकीचे हिंगोलीत तीन, अमरावतीत २३, चंद्रपूर जिल्ह्य़ात १६ गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात अशा फसवणुकीची ५० पेक्षा अधिक प्रकरणे असू शकतात, असा अंदाज मराळ यांनी व्यक्त केला.