News Flash

विद्यार्थिनीच्या दप्तरात गावठी कट्टा!

येथील विद्या निकेतन इंग्रजी शाळा तशी नावाजलेली.

वह्य़ा, पुस्तकं, कंपासपेटी, एखादं मोरपिस, दप्तराच्या कोपऱ्यात हळूच सरकवलेलं कार्टुन.. मुलांच्या दप्तरात हमखास सापडणाऱ्या या गोष्टी. शिक्षकांसाठीही त्या नेहमीच्याच. मात्र, एखाद्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात काडतुसांनी भरलेला गावठी कट्टा सापडला तर? नक्कीच शिक्षकांची पाचावर धारण बसणार! असाच प्रसंग येथील विद्या निकेतन शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला. तिसरीतील एका विद्यार्थिनीने ‘खेळणे’ समजून तिच्या बाबांच्या वापरातला खराखुरा गावठी कट्टा दप्तरात आणला होता.

येथील विद्या निकेतन इंग्रजी शाळा तशी नावाजलेली. या शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गुरुवारी दप्तरात एक वेगळेच खेळणे आणले. आपल्या वर्गमित्र मैत्रिणींना हे खेळणे दाखवायचे आणि मज्जा करायची, या बालसुलभ विचाराने या विद्यार्थिनीने थेट बाबांचा गावठी कट्टाच दप्तरात टाकला. मात्र, जेव्हा तिने हे खेळणे वर्गात बाहेर काढले, त्यावेळी खरा प्रकार शिक्षकांच्या लक्षात आला. संबंधित विद्यार्थिनीने ‘खेळणे’ बाहेर काढताच त्याची खबर शिक्षकांना लागली. खेळण्यासारख्या वाटणाऱ्या गावठी कट्टय़ात काडतुसेही होती! चुकून जरी विद्यार्थिनीने या खेळण्याचा खटका दाबला असता तर संकटच ओढवले असते. शिक्षकांनी तातडीने या मुलीकडील खेळण्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही तातडीने शाळेत धाव घेत विद्यार्थिनीच्या हातातील खेळणे काढून घेतले. मुलीचे वडील सय्यद मुश्ताक सय्यद आझम यांना शाळेत पाचारण करण्यात आले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाशिम येथील लघुसिंचन विभागात शासकीय जीपचालक म्हणून कार्यरत असलेल्या सय्यद यांच्याकडे गावठी कट्टा कसा आला, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:38 am

Web Title: loksatta crime news 5
Next Stories
1 औरंगाबादमध्ये नोटाबंदीमुळे उद्योगांना घरघर
2 अण्णा हजारे व शरद पवारांमध्ये ‘साखर संघर्ष’!
3 मराठवाडय़ात ‘चक्का जाम’; औरंगाबादेत लाठीचार्ज
Just Now!
X