एकाच रात्री एटीएम फोडण्याचा व एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न बुधवारी असफल झाल्यानंतर गुरुवारी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक बंदोबस्तात पोलीस गुंतल्याचे पाहून चोरटय़ांनी घरफोडी करण्याचा डाव साधत तीन ठिकाणी चोरी करून लाखोंचा ऐवज पळवला. घरफोडीसह वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून, चोरटे कॅमेऱ्यात कैद होऊन तपास लागण्याची प्रक्रिया जवळपास बंदच झाली आहे. त्याबाबत विचारणा केली तर निम्म्यापेक्षा अधिक सीसीटीव्ही बंद पडल्याने शोध लावणे अवघड असल्याचे कारण पोलिसांकडून वारंवार ऐकायला मिळत आहे.

पदमपुऱ्यातील काका चौक परिसरात राहणारे जितेंद्र जैन (मूळ मुंबई) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी तब्बल एक लाखाचा ऐवज पळवला. जैन यांचे कुटुंबीय मुंबईला गेले होते. तर स्वत जितेंद्र जैन हे नोकरीवर गेले होते. तोच डाव साधत चोरटय़ांनी दोन तोळय़ांचे मणीमंगळसूत्र, ५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा, सोन्याचा ५ ग्रॅम वजनाचा कानातील दागिना, असे एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी पळवला. गुरुवारी रात्री ८.३०च्या सुमारास जैन घरापर्यंत आले असता त्यांना कडीकोयंडा व कुलूप तुटलेल्या स्थितीत आढळले. चोरीचा संशय आल्याने त्यांनी रेल्वेस्थानक परिसरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. वेदांतनगरच्या पोलीस यंत्रणेने ठसेतज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करून घर व परिसराची माहिती घेतली. जैन यांच्या घरात काही ठसे आढळले असून, श्वानाने मुख्य रस्तापर्यंत माग दाखवला. मुख्य रस्त्यापासून चोरटे वाहनातून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रबुद्ध नगरातील पाणचक्कीच्या परिसरात राहणाऱ्या सीमा संदीप अडसूळ यांच्या घरात दोन भगवे कपडे घातलेल्या व्यक्ती गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घरात आल्या व पूजा करायची म्हणून दागिने घेतले. सीमा यांची नजर चुकवून भगवे कपडे घातलेल्या ठगांनी १२ हजारांचे दागिने लंपास केले. पोलिसांनी या दोन्ही चोरटय़ांना १२ तासात जेरबंद केले. प्रेमनाथ तात्या चव्हाण व साईनाथ गंगाराम जगताप (रा. ओझर, ता. अंमळनेर, जि. जळगाव) यांना ताब्यात घेऊन माल हस्तगत केला.

औरंगाबादेतील अनेक चौकांतील सीसीटीव्ही बंद पडल्यामुळे चोरटय़ांचा तपास लावण्यात यश येत नसल्याचे पोलीस मान्य करत आहेत. औरंगाबादेतील १८ ते २० ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत. त्याचा फायदा चोरटे घेत आहेत. त्यात निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलीस गुंतल्याचे पाहून चोरटय़ांना मोकळे रानच मिळाले आहे. मंगळवारी रात्री चोरटय़ांनी सिडकोतील नवा मोंढा परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच रात्री तनिष्का ज्वेलर्सवर सुरक्षारक्षकाच्या डोळय़ांत आग उठवणारी भुकटी फेकून दरोडय़ाचा प्रयत्न केला. हे दोन मोठी रक्कम पळवण्याचा डाव फसल्यानंतर चोरटय़ांनी गुरुवारी भरदिवसा चोऱ्या केल्या.