बीड जिल्ह्य़ातील माजलगावचा मी रहिवासी. दुष्काळाची भीषणता जवळून पाहिलीच नव्हे तर ती दाहकता काही अंशाने अनुभवली आहे. गावच्या गाव अन् हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकणारे आबालवृद्ध, त्यात जनावरांचे पाण्याअभावी होणारे हाल, विहिरींतील पाण्यासारखेच त्यांचेही खोल गेलेले ‘डोळे’ अन् त्यात दिसणारी चिंता.. हे सर्व चारा छावण्यांमध्ये जवळून पाहिले आहे. तिथेच ‘पाझर’च्या विषयाचा जन्म झाला. आता अंतिम फेरीसाठी दिवसातून दोन-दोन वेळा तालीम सुरू आहे. पाश्र्वसंगीतावरही मेहनत घेणे सुरू आहे, असे मराठवाडा विभागीय स्पर्धेत सवरेत्कृष्ट ठरलेल्या पाझर एकांकिकेचे लेखक व दिग्दर्शक प्रवीण पाटकर यांनी सांगितले.

‘लोकसत्ता लोकांकिके’च्या विभागीय स्पर्धेमध्ये लेखन, दिग्दर्शनासह प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या पाझरच्या विषयामागच्या कथाबीजाची संकल्पना पाटकर यांनी विस्तृतपणे मांडली. बीड जिल्ह्य़ातील दुष्काळामुळे नागरिकांचे पाण्याअभावी होत असलेले हाल, त्यासाठी एकीने देण्यात येणारा लढा, विहिरीला पाणी लागण्यासाठी नरबळीसारखा अघोरी मार्ग पत्करण्याचा मनात खोलवर रुजलेला अंधश्रद्धेचा विचार, बालकापासून ते वृद्धापर्यंत सर्वानाच पाण्यासाठी असलेली तळमळ, याचे सादरीकरण पाटकर यांनी पाझरमधून मांडले आहे. हेच लेखन आता कलाकारांच्या सशक्त अभिनयातून रंगमंचावर उतरवून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत बाजी मारण्याचा कलाकारांचा प्रयत्न आहे.

लेखनासह दिग्दर्शक म्हणूनही त्याकडे पाहिले तर विषयातले नेमके सादरीकरण कसे असायला हवे, त्याची मांडणी, याचा अंदाज येतो. कलाकारांकडून हवा तसा अभिनय करून घेतला तर सादरीकरणातून उंची गाठता येऊ शकते. आता अंतिम फेरीसाठी कलाकारांचा अभिनय व परिणामकारक पाश्र्वसंगीत या दृष्टीनेच तयारी सुरू आहे.

प्रवीण पाटकर, लेखक, दिग्दर्शक