मराठवाडय़ातील तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

मराठवाडय़ातून आलेल्या युवा कलावंतांनी शेतक री आत्महत्यांसह विविध सामाजिक विषयांवर भाष्य करीत ‘लोकसत्ता लोकांकिके’तील ‘नाटय़सप्तक’ सादर केले. शुक्रवारी दिवसभरात सात एकांकिकेचे सादरीकरण झाले.  विविध भागांतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या लोकांकिका स्पर्धेला शुक्रवारी येथील तापडिया नाटय़गृहात थाटात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी परीक्षक अनंत कुलकर्णी, माधुरी सातभाई, ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

स्पर्धेत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसह, औरंगाबादचे शिवछत्रपती महाविद्यालय, जवाहरलाल इंजिनिअरिंग महाविद्यालय, परभणी येथील श्री शिवाजी कॉलेज आदी महाविद्यालयांतील कलावंतांनी एकांकिकांमधून शेतकरी आत्महत्या व त्या थांबवण्यासाठी तरुणांनी जबाबदारीने पुढे येण्याची गरज, बलात्कार व त्यातील आरोपींवर कारवाईसाठी निघत असलेले मोर्चे, पीडितेच्या जातीवरून होणारे राजकारण, घरातील ज्येष्ठांचे स्थान, त्यांचे महत्त्व, असे अनेक सामाजिक विषय मांडले. दरवर्षी लोकांकिका स्पर्धा कधी होतात, याची आम्ही वाट पाहतो. पुढील अनेक स्पर्धामध्ये उतरण्यापूर्वी पहिला प्रयोग या स्पर्धेत व्हावा, असा आमचा प्रयत्न असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पहिल्यांदाच ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून सादर झाल्या. या स्पर्धेमुळे मराठवाडय़ातील गुणवत्ता मुंबईपर्यंत पोहोचते, अशी प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अशोक बंडगर यांनी व्यक्त केली.