‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेस औरंगाबादेत उत्साहात प्रारंभ
देवदासी प्रथेपासून ते सादत हसन मंटोपर्यंत जाणाऱ्या वैचारिक पातळीवरील विषय हाताळत महाविद्यालयीन युवक-युवतींनी ‘लोकसत्ता-लोकांकिका’ या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित एकांकिका स्पर्धेस मंगळवारी औरंगाबादेत प्रारंभ झाला. परीक्षक पद्मनाभ पाठक व अमेय उज्ज्वल यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दिवसभरात ७ एकांकिकांचे सादरीकरण झाले. उद्याही (बुधवार) स्पर्धा सुरू राहणार आहे. राज्यातील १३० महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली आहेत.
तापडिया नाटय़मंदिरात सकाळी मराठवाडय़ातील विविध महाविद्यालयांमधील युवक-युवती या नाटय़जागरासाठी मोठय़ा उत्साहात सहभागी झाले. महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी ‘फिरुनी पुन्हा गवसेन मी स्वत:ला’ ही एकांकिका, तर डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नृत्य विभागाने ‘भक्षक’ ही एकांकिका सादर केली. शहरी भागांतील अतिक्रमणांमुळे वन्यजीव कसे गावात येत आहेत व त्याचा वस्त्यांवर काय परिणाम होतो, याचे भेदक चित्रण या एकांकिकेत केले आहे. जालना येथील जेईएस महाविद्यालयाने सादत हसन मंटो लिखित ‘खुदा की कसम’ एकांकिका सादर केली. औरंगाबाद जिल्हय़ातील कन्नड येथील शिवाजी आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेजने ‘याला म्हणतात नाटक’, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाने ‘देवदासी’ ही एकांकिका सादर केली. दिवसअखेरीस मराठवाडा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी ‘गाठ’ ही एकांकिका सादर केली. या स्पध्रेसाठी टॅलेण्ट पार्टनर म्हणून आयरिस प्रॉडक्शन आणि नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल यांची साथ लाभली आहे, तर रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र काम सांभाळणार आहेत. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांमधील चांगल्या कलाकारांचा शोध घेता यावा, यासाठी ‘आयरिस’ या टॅलेंट पार्टनरतर्फे वैभव चिंचाळकर व अभय परळकर यांची उपस्थिती होती. मराठवाडय़ातील विविध महाविद्यालयांतील स्पर्धकांनी उत्साहात सहभाग नोंदविला.