09 April 2020

News Flash

बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान

गहू, ज्वारी भिजली, मोसंबी, संत्री झडली

संग्रहित छायाचित्र

राज्यात वर्तवण्यात आलेल्या पावसाचे अंदाज कधी नव्हे ते खरे ठरू लागले आहेत. पावसाच्या अंदाजानुसार मंगळवारी व बुधवारी मराठवाडय़ातील काही भागात हलका, मध्यम व जोरदार बेमोसमी पाऊस झाला असून त्यामुळे शेतीतील काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, मका आदी पिकांसह मोसंबी, संत्रा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद शहरात बुधवारी रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह औरंगाबाद शहरासह परिसरातील चितेगाव, आडगाव, पिंपरी, गोलवाडी, गोलटगाव, पैठण, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, वैजापूर, बिडकीन, गंगापूर आदी तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. वादळ-वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे काही तास औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील वीजही गूल झाली होती.

अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेले आणि सध्या सोंगणी सुरू असलेले गव्हाचे पीक मात्र अक्षरश: आडवे झाले. ज्वारीही काढून ठेवण्यात आली असून ती यंत्रातून काढण्याची तयारी शेतकरी करीत असतानाच पावसाने झोडपले. काही ठिकाणी मकाही काढायचे काम सुरू होते. मात्र पावसाने तेही काम अर्धवट राहिले असून आता भिजलेल्या मक्यातून हाती काय येणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. गोलेगाव येथील संतोष जिते म्हणाले, गावात  गव्हाची सोंगणी सुरू असतानाच मंगळवारी पाऊस सुरू झाला. मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने एवढे नुकसान झाले नव्हते. मात्र कालच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

सध्या मोसंबीचा  अंबेबहार सुरू आहे. नेमका याच काळात मंगळवारी व बुधवारी आडगाव, चितेगाव आदी परिसरात वादळ-वाऱ्यासह पाऊस झाला. मोसंबीचा अंबेबहार पूर्ण झडल्याने  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मोसंबीसह संत्रा उत्पादक, गहू, ज्वारी, मका शेतीचेही अतोनात नुकसान झाले, असे आडगाव येथील अशोक लोखंडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:01 am

Web Title: loss of crops due to unseasonal rainfall abn 97
Next Stories
1 साखरेचा कोटा वाढवून देण्याचा निर्णय
2 Coronavirus : मराठवाडय़ात १ हजार २८ जणांचे विलगीकरण; १८ जणांचे अलगीकरण
3 घ्या! लग्नाची हौस फिटली; वधू-वर, आईवडिलांसह भटजीही पोलिसांच्या ताब्यात
Just Now!
X