औरंगाबाद : मराठवाडय़ात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ३३७.८५ टक्के पाऊस जास्त झाला. अचानक पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे  कापणीनंतरच्या पिकावर जागच्या जागी मोड येऊ लागले. यात सोयाबीन, बाजरी आणि मका या पिकांचे ७० टक्क्य़ांहून अधिक नुकसान झाले आहे. कापसाच्या बोंडात पाणी शिरल्यामुळे सरकीला पुन्हा कोंब आले. मराठवाडय़ातील ४८ लाख हेक्टरपैकी ३० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून तातडीने चार दिवसांच्या आत सरसकट पंचनामे केले जावेत, असे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. केवळ पंचनामे करून न थांबता पीक विमा कंपन्यांना झालेल्या नुकसानीची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी, असे निर्देशही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.

लातूर, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्य़ांमध्ये अधिक नुकसान असून औरंगाबाद जिल्ह्य़ात मका आणि बाजरीचे पीक हातचे गेले आहेत. खरीप हातचा गेल्याने दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्याला नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेबाबतच्या हालचाली अधांतरी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कारभाराला सुरुवात केली. त्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांशी संपर्क साधून पिकांच्या नुकसानीबाबतची माहिती जाणून घेतली.

मराठवाडय़ात सर्वाधिक नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे. कापणीसाठी काढलेले पीक खळ्यापर्यंत गेले नाही. जागच्या जागीच पिकांना मोड आले. यात सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३० लाख २५ हजार ७६२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची आकडेवारी आहे. उद्यापासून तलाठी आणि महसूल मंडळातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यास सांगितले असून शक्य असतील तेथील नुकसानीचे छायाचित्रही पाठवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साडेआठ हजार गावांमध्ये सर्वत्र नुकसान झाले असल्याचे समोर येत असून सोयाबीन, कापसाचे नुकसान सर्वाधिक आहे. १२ लाख २८ हजार ९४० हेक्टरावरील सोयाबीन, तर ११ लाख ४४ हजार ५२९ हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान आहे. कापसाच्या दोन वेचण्या पूर्णत: हातच्या गेल्या असून थोडाफार कापूस तिसऱ्या वेचणीच्या वेळी हाती लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, अशा पद्धतीचा पाऊस झाल्यानंतर कापसावर लाल्या रोग येतो, अशी कृषी विभागाचे अधिकारी सांगतात.

९० टक्के पिकाला फटका

मराठवाडय़ात ऑक्टोबर महिन्यात सरासरी ५४.३० मि.मी. पाऊस अपेक्षित होता. त्यापेक्षा ३३७ टक्के पाऊस अधिक झाला असल्याने नुकसान अधिक आहे, असे प्रशासन आणि मंत्रीही मान्य करत आहेत. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी बदनापूर तालुक्यातील काही ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘९० टक्के पिकांचे नुकसान आहे. पंचनाम्यासाठीचे आदेश देण्यात आले आहे. पण सततच्या पावसामुळे पिके हातची गेली आहेत.’