12 December 2017

News Flash

वीजकपातीमुळे दिवसाकाठी लाखो लिटर दुधाची नासाडी

औरंगाबाद शहरात असे दिवसभरात किमान एक लाख लिटर दूध नासले जात आहे.

बिपीन देशपांडे, औरंगाबाद | Updated: October 7, 2017 4:42 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

विक्रेत्यांपासून उत्पादकांपर्यंत सर्वच त्रस्त

‘वीजकपातीला साधारण ९ सप्टेंबरला सुरुवात झाली. त्याला उद्या एक महिना होईल. या महिनाभरात दहा वेळेस दूध फाटले. एकावेळेस साधारण तीनशे लिटर दुधाचे नुकसान होते. यातून दिवसभरात १० ते १५ हजार रुपयांचा फटका बसतो..’ रोषण गेट परिसरातील सीमा दूध डेअरीचे शेख अदील सांगत होते. अशीच काहीशी व्यथा सिडको, एन-७ मधील डेअरीचालक विष्णू तुपे पाटील यांचीही. वीजकपातीमुळे मागील महिनाभरात २५ हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले. आपली डेअरी तशी छोटेखानी. दिवसभरात साधारण ५०० लिटपर्यंत दुधाची विक्री होते. दुधाला वास आला तर ग्राहक ते परत करतो. हे नुकसान आम्हा डेअरीवाल्यांनाच सहन करावे लागतेय, असे तुपे पाटील सांगतात. औरंगाबाद शहरात असे दिवसभरात किमान एक लाख लिटर दूध नासले जात आहे. यातून होणाऱ्या अर्थकारणाचे नुकसान दिवसाला ४ लाखांपेक्षाही अधिकचे आहे, असे डेअरीचालक सांगतात.

औरंगाबादेत ३०० ते ३५० लहान-मोठय़ा डेअऱ्या असून त्यातून शहरात दररोज साडेचार लाख लिटर दूध येते. त्यात तीन लाख लिटर दूध हे बंद पिशव्यांमधून येणारे तर उर्वरित खुले दूध असते. दूध पिशवी किंवा खुल्या दुधाला फ्रिज किंवा डीपफ्रिजसारख्या शीत साधनांमध्ये ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.

आदिल शेख सांगतात, पशुपालक सकाळी ५ ते ६ च्या सुमारास दूध काढतात. डेअरीपर्यंत आणण्यासाठी ७ ते ८ वाजतात. आणले तेवढय़ा दुधापैकी अध्र्याच दुधाची विक्री होते. उर्वरित दूध डीपफ्रिजमध्ये साठवून ठेवावे लागते. भारनियमनामुळे या ठेवलेल्या दुधासाठी आता आम्ही बर्फ खरेदी करतो. डेअरीतून दिवसभरात साधारण ३ हजार लिटर दूधाची विक्री होते. एवढे दूध टिकवण्यासाठी एक हजार रुपये हे बर्फावर खर्च करावे लागत आहेत. किराडपुरा भागातील राम मंदिराशेजारच्या जनता डेअरीचे मालक जावेद पटेल सांगतात, की भारनियमनामुळे दूध नासण्याच्या तक्रारी तर वाढल्या आहेतच. पण दुधापासून दही, चक्का, तूप, पनीर बनवण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम झालेला आहे. सकाळी व रात्री मिळून सात ते आठ तास भारनियमन असल्यामुळे कारागिरांची वेळ बदलावी लागली. दोन जणांच्या वेळेचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी काम सोडले.

तुपे पाटील सांगत होते, ग्राहकाला चांगले दूध अपेक्षित असते. त्याचा वास येत असेल तर ते दूध तो परत करतो. सकाळी  फ्रिजरमध्ये ठेवलेले दूध सायंकाळपर्यंत टिकायचे. रात्रीचे दूध सकाळपर्यंत राहायचे. आता सकाळचे दूध रात्री विकता येत नाही आणि रात्रीचे सकाळी. आपल्यासारख्या डेअरीचालकाला २५ हजारांचे नुकसान सहन करावे लागले.

सातारा परिसरातील देवळाई भागातही सात ते नऊ तास वीजकपात सुरू आहे. तेथील किराणा व्यावसायिक राजेश्वर कुलकर्णी सांगतात. बंद पिशवी दुधासह आइस्क्रीम, शीतपेय, पाणी बाटलीच्याही विक्रीवर परिणाम होत आहे. सात ते आठ तासांच्या भारनियमनामुळे आइस्क्रीम विरघळून जात आहे. दुधाची पिशवी दुसऱ्या दिवशी विक्री केली तर ग्राहक दूध फाटले म्हणून परत आणतात. त्यांना एकतर पैसे परत करावे लागतात किंवा दुसरे ताजे दूध द्यावे लागते.  तेही पहिल्या पैशांमध्येच. फाटलेल्या दुधातून २२ ते २५ रुपयांचा फटका आम्हालाच सहन करावा लागत आहे.

वीजकपातीविरोधात एमआयएमचा संताप

मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या वीजकपातीविरोधातील संताप शुक्रवारी बाहेर पडला. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद व जालना परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या दालनातील वस्तूंची तोडफोड केली. वातानुकूलित यंत्रासह टेबलच्या काचा फोडल्या. मोठय़ा समूहाने एमआयएमचे कार्यकर्ते, पदाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वीजकपातीच्या प्रश्नावर महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा केली.

First Published on October 7, 2017 4:42 am

Web Title: loss of millions liters of milk per day due to power cut in aurangabad
टॅग Milk