मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ात मान्सूनच्या पावसाने बुधवारी रात्री जोमदार बरसात केली. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्य़ात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. या जिल्ह्य़ात कमी-अधिक आणि तुरळक स्वरूपात पाऊस पडत असला, तरी पाणवठे भरण्याइतका पाऊस नसल्याने बहुतेक ठिकाणी टँकर सुरूच असल्याचे चित्र आहे.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सुमारे २३ गावात मोठे नुकसान झाले. कुरुंदा येथील सुमारे ३५० कच्च्या घरांची पडझड झाली. जवळपास ५० शेळ्या व २५हून अधिक मोठी जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. नदी-नाल्याकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रचंड नुकसान झाले.

हदगावमध्ये महिलेचा बळी

नांदेड जिल्ह्णाात बुधवापर्यंत सरासरीच्या २१२ मिमी पाऊस झाला. रात्री तब्बल ६१६ मिमी पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यात १०७.३३ मिमी, भोकरमध्ये ९८.७५, तर हिमायतनगर तालुक्यात ७६ मिमी वृष्टी झाली. भोकरमधील रेणापूरचा सुधा प्रकल्प ओसंडून वाहात आहे. पावसाळ्यात आजवर चार तालुक्यात सात वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. हदगाव तालुक्यात वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. लातूरमध्ये मात्र दिवसभरात काही ठिकाणी भूरभूर, तर काही ठिकाणी हूरहूर अशी पावसाची अवस्था असल्यामुळे जमिनीची तहान अजून भागलीच नाही.

दोन दिवसात झालेल्या पावसाने परभणी जिल्ह्णााच्या सरासरीतही वाढ झाली आहे. सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात १९.७८ मिमी नोंद झाली. आतापर्यंत १२३.१९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्णाात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. जिंतूर, पूर्णा, सेलू भागात सर्वाधिक पाऊस झाला. सोनपेठ परिसरात मात्र हलक्या सरी बरसल्या. बोरी येथे संततधार पावसाने काही ठिकाणी पाणी साचले. शहरातील काही दुकानांमध्येही पाणी शिरले. सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पात आजही पाण्याचा ओघ सुरूच होता.

बीडमध्ये ‘गेला पाऊस कोणीकडे’?

बीड जिल्ह्य़ात दुष्काळ दाहकतेनंतर चांगल्या पावसाची प्रतीक्षा सुरूच आहे. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला आलेल्या पावसाने आशा पल्लवित झाल्या. मात्र, महिना लोटला तरी दमदार पाऊस न झाल्याने ५० टक्केही खरीप क्षेत्रावर पेरणी होऊ शकली नाही, तर अजून कोठेही पाणी खळखळले नसल्याने जून संपला तरी ‘गेला पाऊस कोणीकडे?’ अशी स्थिती निर्माण झाली झाली आहे. जूनअखेर केवळ १२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी ७००पेक्षा अधिक टँकरवरच तहान भागवणे चालूच आहे.