रावसाहेब दानवे यांचे जानकरांना कृषी प्रदर्शनावेळी बौद्धिक

कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी हजेरी लावणारे पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांना दोन-अडीच तासांहून अधिक ताटकळत थांबावे लागले. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उशिरा पोहोचले. उद्घाटन झाले आणि रावसाहेबांनी जानकरांवर टोलेबाजी केली. विविध योजनांची माहिती भाषणातून देणाऱ्या जानकरांना रावसाहेब दानवे म्हणाले, आता एक नवीन योजना करा. त्याचे नाव ‘शहाणे करून सोडा सकळ जन’ असे ठेवा. शासनाच्या विविध योजना असतात, पण त्या पोहोचतच नाही. त्यात प्रशासकीय अधिकारी अडथळा आणत असतात, असे नाही तर त्या योजना पोहोचत नाहीत, त्यासाठी पुढील प्रदर्शनांमध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे दालन ठेवा आणि माहिती सांगण्यासाठी माणूसही नेमा, अशी सूचना त्यांनी केली.

औरंगाबाद येथे महाअ‍ॅग्रो नावाने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, भीमा-कोरेगावच्या पाश्र्वभूमीवर त्यांचा दौरा रद्द झाला. महादेव जानकरा यांनी कृषी प्रदर्शनातील विविध दालनांना भेटी दिल्या. उद्घाटनाच्या वेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. जालन्यातील कडवंची गावातील जलसंधारणाच्या कामामुळे मत्स्यबीज योजनेची कशी आखणी झाली, हे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर भाकड जनावरांना सांभाळण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेला एक कोटी रुपयांची योजना कशी लागू पडते, हेदेखील त्यांनी सांगितले. या त्यांच्या भाषणाचा धागा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पकडला. ते म्हणाले, योजना खूप असतात, पण त्याची माहिती लोकांपर्यंत दिली जात नाही. आता ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ अशी योजना करण्याची गरज आहे.  युरियाला नीमकोट दिल्यामुळे नक्की काय आणि कोणते फायदे झाले, हे कोणी सांगत नाही. त्याची भाषा बदलायला हवी. आता जानकरांच्या भाषेत सांगतो, शेळीला पिल्ले झाली की, तिच्या पिल्लांनी दूध पिऊ नये म्हणूनआळपण केले जाते. म्हणजे दूध येण्याच्या जागेला शेण लावले जाते. त्यामुळे पिल्लांनाही एरवी दूध मिळत नाही. मालकाला जेव्हा हवे असते तेव्हा तो पिल्लांनाही पाजतो आणि स्वत:ही काढून घेतो. नीमकोट युरियामुळे अगदी हेच घडले. युरियाला नीमकोट लावल्यामुळे युरियाचा इतर उद्योगात होणारा वापर थांबला आणि युरियासाठी आता शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत नाही. अशा अनेक योजनांची माहिती द्यायला हवी. असे सांगत जानकरांचे बौध्दिक घेतले.