भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी वादग्रस्त दसरा मेळावा नको अशी भूमिका कायम ठेवली, तर पंकजा मुंडे समर्थक मेळाव्यासाठी आक्रमक असल्याने यंदाही मेळावा कोठे आणि कसा होणार याची अनिश्चितता निर्माण झाली आहे. वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षांत महंत शास्त्री व मंत्री मुंडे दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने गडाच्या भक्तांची मात्र कोंडी झाली आहे. मागचा मेळावा गडाच्या पायथ्याला यशस्वी करून मुंडेंनी आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. विकासासाठी त्यांनी गडाच्या वादात एक पाऊल मागे येण्याची भूमिका घेतली तरी महंतांकडून प्रतिसाद न मिळाल्याने धर्मसत्ता व राजसत्तेतील संघर्ष कायम राहिला आहे.

बीडसह राज्यभरातील वंजारी व विविध जाती धर्मातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र भगवानगडावर काही वर्षांपासून दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीतील दसरा मेळाव्याची परंपरा रूढ झाल्याने त्यांचे समाजावर एकमुखी नेतृत्व प्रस्थापित झाले होते. मात्र मुंडे यांच्या निधनानंतर कट्टर विरोधक बनलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना एकाच वेळी राज्यस्तरावर संधी मिळाल्याने समाजात समांतर दोन सत्तास्थाने उभी राहिली. तरीही महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडेंच्या राजकीय वारस पंकजा मुंडे यांना गडाची कन्या जाहीर करून समाजाचे नेतृत्व बहाल केले. दरम्यान गडावर धनंजय मुंडे यांच्यावर दगडफेक झाल्यानंतर महंत शास्त्री यांचे पुतळे जाळण्यात आले तर राजकीय कार्यक्रमामुळे गुन्हा दाखल झाल्याने शास्त्रींना काही काळ फरार राहावे लागले. या काळात सत्ताधारी नेतृत्वाकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याने महंत व्यथित झाले, तर बहीण-भावाच्या राजकीय संघर्षांत गड भरडला जात असल्याने महंतांनी अस्वस्थता व्यक्त केली. दरम्यान पंकजा मुंडे यांनी परळी येथे गोपीनाथगड उभारल्यानंतर महंत शास्त्री यांनी यापुढे भगवानगडावर राजकीय भाषणबाजी होणार नाही अशी घोषणा केली आणि दसरा मेळाव्यावरून ‘राजसत्ता विरुद्ध धर्मसत्ता’ असा संघर्ष उभा राहिला. मंत्री पंकजा मुंडे यांनी गडावर मेळावा घेण्याचा चंग बांधला. पण अखेरच्या क्षणी प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मंत्री मुंडे यांनी गडावरील कटकारस्थानाचा बुरूज उतरून आपण पायथ्याला आल्याचे सांगत मेळावा यशस्वी केला. पुढच्या वर्षी गडाचे महंत सन्मानाने बोलवतील आणि मेळावा गडावरच होईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. वर्षभरात गडावरील सभागृहाच्या बांधकामावरून महंतांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागला. महंतांना बदलण्यासाठीही वेगवेगळे प्रयत्न झाल्याने वाद धुमसतच राहिला. मंत्री मुंडे यांनी गहिनीनाथगडाच्या विकासासाठी निधी मंजूर केल्यानंतर भगवानगडाच्या विकासासाठीही आपण एक पाऊल मागे येण्यास तयार असल्याचे जाहीर केले. पण महंत शास्त्रींकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. गडावर मेळाव्याला परवानगी मिळाली नाही तर पायथ्याला हक्काची जमीन असावी यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता विजय गोल्हार यांनी मुलीच्या नावाने सात एकर जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत मेळावा घेण्यासाठी समर्थकांची तयारी सुरू आहे. वर्षभरापूर्वी मेळावा यशस्वी करून समाजावरील पकड मजबूत असल्याचे मंत्री मुंडे यांनी दाखवले असले तरी लागोपाठ झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला. नेतृत्वाच्या स्पध्रेतून धार्मिक गडाचा दसरा मेळावा वादात आल्याने गडाला मानणाऱ्या भाविकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाहही निर्माण झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गडाच्या वादापासून अलिप्त असले तरी त्यांचे समर्थक मात्र समाजमाध्यमातून आता आक्रमक आहेत. मंत्री पंकजा मुंडे यांनीही दसरा मेळाव्याबाबत भूमिका स्पष्ट न करता ‘समाज ठरवेल’ असे सांगितल्याने समर्थक मेळाव्यासाठी आक्रमक आहेत. या पाश्र्वभूमीवर या वर्षीचा दसरा मेळावा नेमका कोठे होतो, याबाबतची साशंकता निर्माण झाली आहे. तर महंत शास्त्री व मंत्री मुंडे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने गडाला मानणाऱ्या सर्वसामान्य भक्तांना मात्र आपण नेमकी काय भूमिका घ्यावी असे कोडे पडले आहे. दसरा मेळाव्यावरून निर्माण झालेल्या वादाने   वेगवेगळ्या पातळीवर राजकीय शिरसंधान करण्याची संधी अनेक जण साधत असल्याने यात अनेक वर्षे समाजाची घट्ट राहिलेली ‘राजकीय वज्रमूठ’ सल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
  • भगवानगडावर काही वर्षांपासून दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीतील दसरा मेळाव्याची परंपरा रूढ झाली. मात्र मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना एकाच वेळी राज्यस्तरावर संधी मिळाल्याने समाजात दोन सत्तास्थाने उभी राहिली.
  • मेळाव्यावरून निर्माण झालेल्या वादाने वेगवेगळ्या पातळीवर राजकीय शिरसंधान करण्याची संधी अनेक जण साधत असल्याने यात समाजाची घट्ट राहिलेली ‘राजकीय वज्रमूठ’ सल होण्याचा धोका आहे.