07 July 2020

News Flash

कृषीमंत्री दादा भुसे सामान्य शेतकरी बनून कृषी मालाच्या दुकानात पोहोचले आणि त्यानंतर…

शेतकऱ्यांच्या युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी, कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली सत्याची पडताळणी

संग्रहित

औरंगाबाद येथील अनेक शेतकऱ्यांनी युरिया मिळत नसल्याच्या तक्रारींची कृषीमंत्री दादा भुसे यांनी दखल घेतली आहे. शेतकऱ्यांना खतं, बियाणं मिळत आहेत की नाही हे तपासण्यासाठी दादा भुसे यांनी स्वत: दुकानात जाऊन पडताळणी करण्याचं ठरवलं. पण यावेळी दादा भुसे यांनी कृषीमंत्री म्हणून न जाता सामान्य शेतकरी बनून दुकानात पोहोचले. यावेळी दुकानदार खत असतानाही देण्यास नकार देत असल्याचं दादा भुसे यांच्या निदर्शनास आलं. यानतंर त्यांनी जिल्हा कृषी अधिक्षकांना कारवाईचे आदेश दिले. दादा भुसे यांनी यावेळी औरंगाबादमधील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत दादा भुसे यांना अचानक औरंगाबाद शहराला भेट दिली. जिल्हा यंत्रणेलाही त्यांनी याबाबत कळवलं नव्हतं. दादा भुसे थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायजर या दुकानात सामान्य शेतकरी म्हणून गेले. यावेळी त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. दुकानदाराने मात्र दुकानात युरिया शिल्लक असतानाही उपलब्ध नसल्याचं सांगत देण्यास नकार दिला. स्टॉक रजिस्टरची मागणी केली असता तो घऱी असल्याचं दुकानदाराने सांगितलं.

यानंतर दादा भुसे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला असता दुकानात युरियाच्या १३८६ पिशव्या शिल्लक असल्याचं आढळून आलं. यानंतर दादा भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

दादा भुसे यांनी कारवाई करत औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या आणि दुकानातूनच कृषी विभागाच्या सचिवांना दूरध्वनीकरून यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या. शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही यावेळी त्यांनी दिला. राज्यभरातील कृषी निविष्ठा दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 10:10 pm

Web Title: maharashtra agriculture minister dada bhuse check reality after complaints over fertilizer in aurangabad sgy 87
Next Stories
1 टाळेबंदीतील शिथिलतेनंतर दीड हजारांहून अधिक रुग्ण
2 Coronavirus : करोनाबाधित कैदी पळण्याचे सत्र सुरूच
3 खाटा व्यवस्थापनाचा ‘ताळ-मेळ’ नव्याने
Just Now!
X