जिल्ह्याच्या काही भागांत सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. मात्र, अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. मंगळवारी सायंकाळी सर्वत्र पावसाने सुरुवात केली. हिंगोलीतील कयाधू नदी प्रथमच वाहती झाली. आता पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत पावसाने दगा दिल्याने शेतकरी आíथक अडचणीत सापडला होता. नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून जिल्ह्यात सहा महिन्यांत ३०हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या वर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत होऊनही जिल्ह्याच्या काही भागांत सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला. अनेक भागांत पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची बुधवारी सकाळी नोंद घेतली असता आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची वार्षिक सरासरीच्या तुलनेत १४.४६ टक्के नोंद झाली. जिल्ह्यत पडलेल्या पावसाची नोंद मिमीमध्ये, कंसात आतापर्यंत एकूण पडलेला पाऊस- हिंगोलीत ३३.४३ (११६), वसमत ५.२९ (१०७.५३), कळमनुरी १०.५० (२१४.४७), औंढा नागनाथ १२.७५ (७२.५०), सेनगाव २९.३७ (१३३.१५) एकूण ९१.६४. आतापर्यंत एकूण ६४३.४३ अशी नोंद असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत याची १४.४६ टक्के नोंद झाली. गतवर्षी याच तारखेपर्यंत १७.४८ टक्के नोंद झाली होती.

जिल्ह्यात आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे तब्बल दोन मीटरने वाढ झाल्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांमुळे पाणीपातळीत वाढ होण्यासाठी मोठय़ा पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. येणाऱ्या काळात मोठा पाऊस पडला तरच पाणीपातळीत भरीव वाढ होऊन पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघू शकेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.