कर्जमुक्तीसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जात असून गावाकडून शहराला होणारा दूध व भाजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी माहिती शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतमालाला हमीभाव दिला जात नाही व शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत राज्यातील ४२ संघटना किसान क्रांती या नावाने एकत्रित येऊन १ जूनपासून संपावर जाणार असल्याचे जावंदिया म्हणाले. आजवर शेती प्रश्नावर चर्चा भरपूर झाली.आता शेतकरी स्वतला लागेल इतकेच पिकवणार व त्यामुळेच १ जूनपासून भाजीपाला व दुधाचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. कर्जमाफी, मोफत वीज, मोफत ठिबक सिंचन, दुधाला ५० रुपये लिटर भाव,  बिनव्याजी कर्ज, पेन्शन, शेतमालाला हमीभाव व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.

शेतकऱ्यांशी चर्चा करू : फुंडकर

शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाऊ नये, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायला आपण तयार आहोत. लोकांची कोंडी करू  नये, अशी विनंती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली आहे. फुंडकर आज लातुरात आले होते.

तरूण शेतकऱ्यांचा पुढाकार

कोणत्याही परिस्थितीत संप करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट झालेली नसली तरी मुंबईत येणारा भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा रोखण्याचा आंदोलकांचा प्रयत्न राहणार आहे. या आंदोलनासाठी तरूण शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.