सामना न करणाऱ्या विन्डोज-८ चे ५० टक्के संगणक धोक्यात

रॅन्समवेअर प्रकारातील मालवेअरचा फटका देशातील संगणक यंत्रणांना बसला नसल्याचे सांगितले जात असले तरी महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयातील यंत्रणा मात्र सायबर हल्ल्याचा सामना करण्यासाठी सक्षम नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. शासकीय कार्यालयातील बहुतांश कामकाज हे विन्डोज एक्सपी, विन्डोज-७, विन्डोज-८ मधून चालत असून नेमका याच संगणकांना रॅन्समवेअरचा धोका अधिक असल्याची माहिती आहे.

येथील शासकीय कार्यालयांमध्ये विन्डोज एक्सपी, विन्डोज-७, विन्डोज-८ व विन्डोज सव्‍‌र्हर २००३ मधून कामकाज चालते. नव्या प्रकारात मोडणारी विन्डोज-१० ही कार्यप्रणाली फार कमी कार्यालयांमध्ये पाहायला मिळते. रॅन्समवेअरचा नेमका धोका विन्डोज-१० असणाऱ्या संगणकांना होण्याची शक्यता फार कमी प्रमाणात असली तरी विन्डोज एक्सपी, विन्डोज-७ व विन्डोज-८, विन्डोज सव्‍‌र्हर यांना मात्र होऊ शकतो. प्रशासकीय स्तरावर विन्डोज एक्सपी असणाऱ्या संगणकांची संख्या १० टक्के तर विन्डोज-७ व विन्डोज-८ असणारे ५० टक्के संगणक असल्याची माहिती सूचना व विज्ञान विभागातील सूत्रांकडून मिळाली. प्रशासकीय स्तरावरून भारतातील संगणक यंत्रणांना फटका बसणार नसल्याचे सांगितले जात असले तरी सध्या उपलब्ध असणारी संगणकीय यंत्रणा रॅन्समवेअरसारख्या वादळाचा सामना करण्याच्या क्षमतेची नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांना रॅन्समवेअरचा धोक्यापासून काळजी घेण्याच्या सूचना आलेल्या आहेत. अज्ञात मेल न उघडण्याची सूचना आहे.

असा आहे धोका

एखाद्या फेक संकेतस्थळावरून आलेल्या मेलमधून रॅन्समवेअर संगणकात प्रवेश करून सर्व दस्तऐवजामधील माहिती एका वेगळ्या भाषेत केली जाऊ शकते. पुन्हा आपल्या भाषेत ही माहिती हवी असेल तर त्याबदल्यात खंडणीसारख्या प्रकारात मोडणारी एखाद्या बँक खात्यावर मोठी रक्कम जमा करण्याची सूचना मिळू शकते. त्यासाठी खबरदारी म्हणून वेब पेजवरून येणाऱ्या लिंकला महत्त्व न देणे, एखाद्या अज्ञाताचा मेल न उघडणे हे शहाणपणाचे ठरेल. एखाद्या विख्यात नावातील एका अक्षरात बदल करूनही भुरळ पाडली जाऊ शकते. त्याबाबत खबरदारी घेतलेली बरी, अशी माहिती राष्ट्रीय सूचना व विज्ञान कार्यालयातील सूत्रांकडून मिळाली.

पॅच इन्स्टॉल करा

रॅन्समवेअरपासून बचाव करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने तयार केलेले अ‍ॅण्टीव्हायरस ‘पॅच’ इन्स्टॉल केले तर धोका टाळता येऊ शकतो. पॅच हे एखाद्या औषधाप्रमाणे काम करते, असे सांगितले जात आहे. मायक्रोसॉफ्टवरून मालवेअर प्रोटेक्शन सेंटरवरून पॅच डाऊनलोड करता येऊ शकतो.