औरंगाबाद : लाडू, करंजी आणि दिवाळीतले इतर गोड पदार्थ बनवायचे असतील तर रास्तभाव दुकानातून राज्य सरकार यापुढे एकच किलो साखर उपलब्ध करून देणार आहे. स्वस्त भावातली एवढीच साखर आणि सोबतीला दोन किलो डाळ असा शिधा स्वस्त धान्य वितरण प्रणालीतून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक अन्नधान्य वितरणमंत्री गिरीश बापट यांनी दिली. या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘भारनियमन सुरू आहे, रॉकेलही मिळत नाही, आता दिवाळी एक किलो साखरेतच करा, हे धोरणच न कळण्यासारखे आहे.’

राज्यात ५२ हजार ३३० स्वस्त धान्य दुकाने आहेत. येथे ई-पॉस मशीन बसविल्यामुळे धान्यात बचत झाली आहे. दहा लाख बोगस रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. या मशीनमुळे केरोसीन वितरणाच्या नियतनात ३० हजार लिटरची बचत झाली असल्याचा दावा बापट यांनी पत्रकार बैठकीत केला. दिवाळीमध्ये एक किलो साखर आणि दोन किलो डाळ देताना, डाळ कोणती घ्यावी हे शिधाधारकांच्या मर्जीवर ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

एका बाजूला साखरेचे वितरण जेवढे आहे, तेवढेच मीठ मात्र दिले जाणार आहे. आयोडिनयुक्त मिठाची एक किलोची पिशवी आता रास्त भाव दुकानातून मिळणार आहे. साडेबारा रुपयाला ही पिशवी मिळेल, असे बापट म्हणाले. शिधापत्रिकाधारक नसणाऱ्यांनाही आयोडिन मीठ देण्यास सांगण्यात आले आहे.

यासाठी टाटा ट्रस्टबरोबर करार करण्यात आला असून मीठ वितरणाच्या कार्यक्रमास हजेरी लावल्याचेही त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांना सांगितले. जेवढे मीठ तेवढीच साखर म्हणजे एक किलो रास्त भाव दुकानात मिळणार आहे.