स्पष्टीकरणाची अशोक चव्हाण यांची मागणी

सिंचनाचा मुद्दा पुढे करून भाजप राज्यात निवडून आली. त्यानंतर या विभागातील चौकशीचा मुद्दा पुढे करून राजकीय सौदेबाजी केली जात आहे, असे सर्वसामान्य माणसाचे मत आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी सरकारवर मंगळवारी घणाघाती टीका केली. या सरकारचे काम निजाम राजवटीच्या पुढे गेले असल्याचेही ते पत्रकार बठकीमध्ये म्हणाले.

तीन वर्षे सिंचन खात्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीस काँग्रेसचा विरोध नाही. ती चौकशी व्हावीच, पण या मुद्यावर सरकार राजकीय सौदेबाजी करीत आहे. हे सर्वसामान्यांचे मत आहे. त्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असे अशोक म्हणाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशावरून शिवसेना नाराज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. कर्जमाफीतील गोंधळ, नोटाबंदीनंतर काढण्यात आलेल्या अध्यादेशाची आठवण देत म्हणाले, की हे सरकार आता निजाम राजवटीपेक्षा वाईट काम करीत आहे. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहे. तसेच ‘ मेक इन इंडिया’ आता ‘फेक इन इंडिया’ झाला आहे. कर्जबाजारीपणाच्या यादीत महाराष्ट्र हे आता पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, अशी स्थिती आहे. तब्बल चार लाख कोटी रुपयांचे कर्ज सरकारच्या डोक्यावर आहे. कर्ज घेण्यास ना नाही, पण कर्ज घेतल्यानंतर ती फेडण्याची ताकद नसतानाही ते काढले जाणे चुकीचे असल्याचे चव्हाण म्हणाले.

नारायण राणे यांचा ‘एनडीए’ प्रवेश व त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता, यामुळे सेना नाराज असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या विषयावर बोलण्याचे चव्हाण यांनी टाळले. हा प्रश्न शिवसेनेला विचारायला हवा, असे ते म्हणाले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर बालिश असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, ते आता त्याच्याही पुढे गेले आहेत. सर्व आरोप असणाऱ्या मंत्र्यांना ‘क्लीन चीट’  देणारे सरकार ‘क्लीन चीटर’ असल्याचीही टीका त्यांनी केली. या पत्रकार बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे यांची उपस्थिती होती.