बीड आणि परभणी मतदारसंघ

मराठवाडय़ातील परभणी-हिंगोली व उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी हाती येईल. तत्पूर्वीपासून दोन्ही ठिकाणच्या नेत्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप व शिवसेनेच्या अंतर्गत गटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. पक्षादेश पाळून मतदान करण्यापेक्षा घोडेबाजारातून काय साध्य साधता येईल, यावरच सारी भिस्त असलेली निवडणूक कोण जिंकेल, याविषयी उमेदवारांसह त्या-त्या पक्षातील नेतेही आत्मविश्वासाने सांगू शकत नाहीत, इतकी ही निवडणूक गुंतागुंतीची ठरली आहे.

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्र्यांनाही या निवडणुकीत लक्ष घालावे लागले. बीड लोकसभेच्या दृष्टीनेही निवडणुकीचे महत्त्व दुर्लक्षून चालणारे नाही, हे ओळखून आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले सुरेश धस यांना ऐनवेळी पक्षात घेत भाजपकडून मैदानात उतरवण्यात आले. बीड जिल्ह्य़ातील पाटोदा, आष्टी व शिरूर या तीन तालुक्यांत धस यांचा प्रभाव मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेससाठीही या निवडणुकीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. धनंजय मुंडे यांनी भाजपमधून पक्षात घेतलेले रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडे उमेदवारच राहिला नव्हता. अखेर राष्ट्रवादीला अशोक जगदाळे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करावे लागले. राष्ट्रवादीने परभणीची जागा काँग्रेसला सोडून उस्मानाबाद-लातूर-बीडची जागा घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांनी भाजपकडे जाण्याची शक्यता तयार झालेल्या मतांसाठी लातूर-उस्मानाबादमधील काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन धस यांच्या गटातही अस्वस्थता निर्माण केली. अशोक जगदाळे यांना निवडून आणण्याची जबाबदारीही आघाडीच्या नेत्यांवर येऊन पडली आहे. एकूण १००५ मतदारांपैकी आघाडीकडे सर्वाधिक मते आहेत. मात्र, आघाडीत काही नाराज मंडळी भाजपला मतदान करतील, असे चित्र असले तरी भाजपमधील काही नाराजांचा फायदा घेण्याचीही रणनीती राष्ट्रवादीची होती.

परभणतीतही उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. येथे आघाडीचे सुरेश देशमुख विरुद्ध विदर्भातून आयात केलेले शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांच्यात थेट लढत आहे. पूर्वी परभणी-हिंगोली ही जागा राष्ट्रवादीकडे होती. आमदार बाबाजानी दुर्राणी हे प्रतिनिधीत्व करीत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद-लातूर-बीडच्या बदल्यात परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे दुर्राणींना उमेदवारीवर पाणी सोडावे लागले. त्यांचा नाहक बळी गेला. मतदानाला काही तास उरले असताना सुरेश देशमुख यांनी ‘हात’ वर केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आणि आघाडीच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापासून ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठांपर्यंत सर्वाचीच धावपळ सुरू झाली होती. ऐनवेळी आघाडीने सुरेश नागरे यांना रसद पुरवल्यानंतर काही घडू शकते का, याचीही चाचपणी केली होती. एकूण काय तर विजयाची खात्री कोणीही देऊ न शकणारी निवडणूक कोण जिंकेल, याविषयी कमालीची उत्सुकता असून त्यावरून आघाडी आणि शिवसेना-भाजपमध्येही अस्वस्था आहे.