देशात १६ वा क्रमांक; तीन वर्षांत अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीचे आव्हान

स्वच्छता अभियानांतर्गत पहिल्या ५८ हागणदारीमुक्त जिल्हय़ांत राज्यातील पाच जिल्हय़ांचा समावेश आहे. मात्र देशातील ३२ राज्यांत महाराष्ट्राचा क्रमांक अजूनही सोळावा आहे. स्वच्छता अभियानचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यापुढे मोठे आव्हान आहे.

२ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या जयंतीचे निमित्त साधून देशभर स्वच्छता अभियानची घोषणा केली व २ ऑक्टोबर २०१९ मध्ये देशातील एकही व्यक्ती उघडय़ावर शौचास बसणार नाही, असे उद्दिष्ट ठरवले. गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने देशवासीय हे उद्दिष्ट साध्य करतील असे सांगून देशभर या कामासाठी यंत्रणा उभी केली. या मोहिमेत देशात नव्याने २ कोटी ६० लाख ५४ हजार ४४२ शौचालये बांधण्यात आली आहेत. गेल्या २५ महिन्यांत शौचालय बांधणीची वाढ ही १४.३७ टक्के आहे. २०१६-१७ या दहा महिन्यांत नव्याने ८३ लाख ९५ हजार ४८६ शौचालये बांधून पूर्ण झाली. देशातील १ लाख १३ हजार ११८ गावे हागणदारीमुक्त असून यात ५८ जिल्हय़ांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, सांगली, सातारा या पाच जिल्हय़ांचा यात समावेश आहे.

गुजरातची आघाडी

गेल्या दोन वर्षांत शौचालय बांधणीत सर्वात मोठे योगदान देणारा प्रांत म्हणून गुजरातची ओळख आहे. यात नव्याने ३४.४० टक्के घरांत शौचालये बांधली आहेत. राजस्थानमध्ये ३३.०२ टक्के, मेघालय २२.०७, मणिपूर २१.९५, ओरिसा २१.६८, अरुणाचल २१.२६, कर्नाटक २०.१४, पश्चिम बंगाल १९.९५, मध्यप्रदेश १९.३० टक्के शौचालये बांधली आहेत. महाराष्ट्राची गती १५.५२ टक्क्यांवरच अडकलेली आहे.

दरवर्षी १५ टक्के गतीने नवीन शौचालये बांधली गेली तरच स्वच्छ भारत अभियानचे उद्दिष्ट पूर्ण होईल. शौचालयाच्या बाबतीत आता जागरूकता वाढते आहे. स्वच्छता नसल्यामुळे चार टक्के बालकांचा दरवर्षी मृत्यू होतो. एकूण होणाऱ्या मृत्यूत रोज ५.७ टक्के मृत्यू हे स्वच्छतेच्या अभावामुळे जगभर वाढत आहेत. दूषित पाणी प्यायल्यामुळे दररोज २ हजार मुले डायरियामुळे जगभर मरण पावतात. ४० सेकंदाला एका बालकाचा मृत्यू होतो. उघडय़ावर शौचालयास बसणाऱ्या देशात पहिला क्रमांक भारतीयांचा आहे. हा कलंक पुसून टाकण्यासाठी अभियान राबवले जात असले तरी  पुरेशी गती प्राप्त झाली नाही.

..असा कारभार नको

तंटामुक्त अभियान राज्यभरात राबवल्यानंतर व त्यापूर्वीच्या साक्षरता अभियानातही लोकांनी अनुदानासाठी मोठा सहभाग दिला खरा,  मात्र त्यानंतर ना गाव शंभर टक्के साक्षर राहिले, ना तंटामुक्त राहिले. ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ असा कारभार स्वच्छता अभियानच्या बाबतीत परवडणारा नाही.

उत्तराखंड, हरयाणा उद्दिष्टपूर्तीकडे

शंभर टक्के हागणदारीमुक्त राज्यांत सिक्कीम, हिमाचल प्रदेश व केरळचा समावेश आहे. उत्तराखंड ९०.७३, हरियाणा ८७.६० अशी उद्दिष्टपूर्ती झाली आहे. शेवटचा क्रमांक बिहारचा २५.३२, जम्मू-काश्मीर ३४.६३, ओरिसा ३५.२४ तर झारखंड येथे ४२.५५ टक्के शौचालये बांधण्यात आली आहेत. देशातील ९ कोटी ३८ लाख ६३ हजार ८८३ घरांत शौचालये बांधलेली आहेत. ऑक्टोबर २०१४ साली ४२.०२ टक्के घरात शौचालये बांधलेली होती. ऑक्टोबर २०१६ अखेर हे प्रमाण ५६.३९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

शौचालयावर आकाशदिवा

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावातील धर्मेद्र मरीआई यांनी राहायला घर नसतानाही या वर्षी शौचालय बांधून शौचालयावर आकाशदिवा लावून दिवाळी साजरी केली आणि गावासमोर एक वेगळा आदर्श ठेवला. या गावातील बापू टकले या अपंग युवकाने आपले गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करत तो प्रत्येकाला शौचालयाचे महत्त्व पटवत होता. धर्मेद्र मरीआईवाले यांचे कुटुंब हे दरवर्षी ऊसतोडीसाठी जाते. ज्यांना राहायला निवारा नाही, पोटाला अन्न मिळण्याची शाश्वती नाही. असा माणूस शौचालय बांधेल कसा? मात्र घडले वेगळेच. ताडपत्रीच्या पालाखाली राहणाऱ्या धर्मेद्रने या वर्षी शौचालय बांधण्याचे ठरवले व त्याचा वापरही त्यांच्या कुटुंबीयाने सुरू केला. सगळेजण आपल्या घरावर आकाशकंदील लावत होते. धर्मेद्रला घरच नसल्यामुळे त्याने   शौचालयावर आकाशकंदील बांधला व सर्व गावकऱ्यांना एक वेगळा संदेश दिला.

लोकचळवळ बनण्याची गरज

पाणी व स्वच्छतेच्या बाबतीत जगभर लोक जागरूक होत आहेत. बांगलादेशसारख्या छोटय़ा देशात व्याजाने पसे घेऊन लोक शौचालय बांधत आहेत. पिण्याचे पाणी स्वच्छ असावे याबाबतीत गावकरी जागरूक असून त्यासाठी आपल्या मिळकतीतील वाटा खर्च करायला तयार आहेत. आपल्या देशात स्वच्छ भारत चळवळीला अधिक गती देण्यासाठी लोकांच्या मूलभूत अडचणीचा विचार करून त्यावर उपाय शोधले गेले पाहिजेत.