महंत शास्त्रींनी पंकजा मुंडेंचा प्रस्ताव धुडकावला

भगवानगडावर विकासाचा वाद नाही, भाषणाचा आहे. सत्तेने मन जिंकता येतील, गड नाही. मागच्या वर्षीचा दसरा मेळावा आठवला तरी त्रास होतो. त्यामुळे पंकजा मुंडेंनी भाषण करणार नाही, असे जाहीर करून यावे, अशा शब्दात महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांचा भगवानगडाच्या वादात एक पाऊल मागे घेण्याचा प्रस्ताव धुडकावला. त्यामुळे मंत्री मुंडे आणि महंत शास्त्री यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता धुसर झाल्याने पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे.

बीड जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवरील श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथगडाच्या स्थापनेच्या दिवशीच भगवानगडावरून पंकजा मुंडेंचे भाषण होणार नसल्याचे जाहीर केले. पंकजा मुंडे यांच्या भाषण बंदीमुळे महंत व मुंडे समर्थकांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान, गडावर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर मंत्री मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेऊन आपली राजकीय पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आणि पुढच्या वर्षी दसरा मेळाव्याला महंतच गडावर बोलावतील, असा दावाही केला. मात्र महंत शास्त्री यांनी कोणत्याही परिस्थितीत गडावर राजकीय भाषण होणार नाही, ही भूमिका कायम ठेवली. दरम्यान, शासनाच्या निधीतून गडावर बांधण्यात आलेल्या सभा मंडपाची चौकशी झाल्याने महंत शास्त्री यांनी दहा लाख रुपये शासन खाती जमा केले. मागील महिन्यात गहिनीनाथगडाच्या नारळी सप्ताहाच्या समारोपात मंत्री मुंडे यांनी आपण भगवानगडाच्या विकासासाठीही लहान व्हायला तयार आहे, महंतांना शरण यायला तयार आहे. मला विकास करू द्या, असे जाहीर सांगत भगवानगडाच्या वादात एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे महंत काय भूमिका घेतात याकडे सर्वाचेच लक्ष होते. मात्र माध्यमांशी बोलताना महंतांनी पंकजा मुंडे यांचा प्रस्ताव धुडकावून लावला.