औरंगाबादमधील पडेगाव येथील हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. दारुच्या पार्टीवरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला आणि यातूनच तरुणाची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू शेखलाल लोखंडे याला अटक केली आहे.

पडेगावातील चैतन्यनगराजवळून वाहणाऱ्या नाल्याजवळ १३ सप्टेंबर रोजी योगेश साहेबराव आहेर याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात योगेशची हत्या का करण्यात आली हे उघड झाले. योगेश आहेर व राजू लोखंडे हे दोघे मित्र होते. घटनेच्या काही दिवस अगोदर योगेश आहेर याच्या भावाने टेम्पो खरेदी केला होता. टेम्पोची पार्टी दे, असा तगादा राजू लोखंडेने योगेशकडे लावला होता. १२ सप्टेंबर रोजी दुपारी योगेश आहेर व राजू लोखंडे हे दोघे पडेगावातील चैतन्यनगर येथे असताना त्यांनी पार्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी योगेश याच्याजवळ दारूची एक बॉटल होती. त्यानंतर राजू लोखंडे याने आणखी एक दारूची बॉटल विकत घेतली. दोघेही चैतन्यनगरातून वाहणाऱ्या नाल्याजवळ मद्यपान बसले होते. त्यावेळी राजूने योगेशला सुनावले होते. तुझ्या भावाने टेम्पो घेतला आहे, तू पार्टी देण्याऐवजी मलाच दारूचा खर्च करायला लावलास, असे राजूने सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आपण योगेशला मारहाण करण्यास सुरुवात. या मारहाणीत योगेश बेशुद्ध झाला आणि भीतीपोटी मी तिथून पळ काढला, अशी कबुली राजूने पोलीस चौकशीत दिली. राजू लोखंडेला शरणापूर भागातून अटक करण्यात आली.