औरंगाबादमध्ये माणुसकीचे दर्शन, करोना उपचारासाठीची रक्कम

औरंगाबाद : करोना महामारीत माणुसकीच हरवून बसल्याच्या काही घटना समोर येत असतानाच औरंगाबादेत मात्र, समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी अजून शाबूत असल्याचे एक उदारण गुरुवारी समोर आले. करोना झालेल्या पती आणि मुलाच्या उपचारासाठी म्हणून दागिने गहाण ठेवून आणलेले २ लाख ८० हजार रुपये हरवल्यानंतर ज्याला सापडले त्याने प्रामाणिकपणाचा कुठलाही अभिनिवेष न बाळगता रक्कम परत केल्याचा अनुभव ग्रामीण भागातून आलेल्या एका वयोवृद्ध महिलेला आला.

सिल्लोड तालुक्यातील अंधारीजवळच्या आडमार्गावरील एका गावातील राधाबाई मापारी यांची ही रक्कम औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयाच्या परिसरातून हरवली. त्यांनी एका गाठोडय़ात २ लाख ८० हजार रुपये ठेवले होते. मात्र, ते गाठोडेच एमजीएमच्या समोरील भागात एका दुकानाजवळ पडले. डॉ. भाले रक्तपेढीत थॅलिसिमियाच्या रुग्णासाठी रक्तदान करून रस्त्यावरून जाताना विजय उकलगावकर यांना ते गाठोडे दिसले. त्यातील ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल त्यांच्या दृष्टीस पडले. पैसे कोणाचे आहेत म्हणून विजय यांनी गाठोडय़ाची आणखी चाचपणी केली असता त्यात एका सराफा दुकानाची पावती आढळून आलेली. त्या पावतीवरील नावावरून हरवलेले पैसे कोणाचे आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उकलगावकर यांनी त्यांच्या परिचित एका सराफ व्यावसायिकाशी संपर्क साधून पावतीच्या दुकानदाराचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढय़ात राधाबाई या धायमोकलून हरवलेल्या पैशांचा उल्लेख करत रडताना उकलगावकर यांना दिसल्या. त्यांच्याकडून पैसे किती आणि गाठोडय़ात काय-काय असल्याची खात्री केल्यानंतर उकलगावकर यांनी अन्य काही उपस्थितांच्या समोरच दोन लाख ८० हजार रुपये राधाबाईंकडे सुपुर्द केले. राधाबाईंनी पती व मुलाच्या करोनावरील उपचारासाठी गहाण ठेवून पैसे आणल्याचे आपल्याला सांगितले, असे विजय उकलगावकर म्हणाले. उकलगावकर हे समाजकार्याशी संबंधित एका अशासकीय संस्थेत काम करतात.