|| सुहास सरदेशमुख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत भारतीय संविधानाच्या अभ्यासाची निर्माण झालेली गरज ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांच्या सर्व पदवी अभ्यासक्रमातील पहिल्या सत्रात ‘भारतीय संविधान’ हा विषय अनिवार्य केला आहे. संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये अगदी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्रातील विद्यार्थ्यांनाही हा विषय शिकवला जाणार आहे. पदवी परीक्षेतील पहिल्या सत्रात ५० गुणांची प्रश्नपत्रिकाही काढण्यात येणार आहे. लोकप्रशासन, राज्यशास्त्र, विधि व न्याय विभागातील तज्ज्ञ हा विषय शिकवतील, असे नियोजन करण्यात आले आहे.  विद्यापीठातील विविध पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच घटकांमध्ये या विषयाची विभागणी करण्यात आली असून राज्यघटनेचा इतिहास, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, संसद- विधिमंडळ- राष्ट्रपती याबाबतची माहिती असणारा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. राज्यघटनेच्या अभ्यासाची गरज लक्षात घेऊन २०१७ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम ठरविण्यात आला. त्यातील काही भाग आता पदवीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आला आहे. यापूर्वी विद्यापीठ परिसरातील विभागातच हा विषय शिकवला जात असे. आता त्याची व्याप्ती संलग्न महाविद्यालय आणि पदवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत करण्यात आली आहे.

‘‘प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान वाचले पाहिजे. तसेच त्यातील महत्त्वाच्या तरतुदी समजून घेतल्या पाहिजेत. हा हेतू नजरेसमोर ठेवून विद्यापीठाने भारतीय संविधान हा विषय पदवी व पदव्युत्तर स्तरावर सुरू केला आहे. भारतात सुजाण नागरिक बनविण्याच्या दृष्टीने संविधान अभ्यासणे ही पायाभरणी ठरेल. – डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

पदव्युत्तर अभ्यासक्रमातील हजारांहून अधिक विद्यार्थी राज्यघटना ऐकण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पदवी घेणाऱ्या सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानाचा विषय पहिल्या सत्रात अनिवार्य करावा, अशी विनंती करण्यात आली होती. विशेष म्हणजे विदेशातून शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थीही हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना त्यांच्या भाषेत हा विषय शिकविण्याची व्यवस्था केलेली होती. –  प्रा. डॉ. सतीश दांडगे, लोकप्रशासन