18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

नुकसान भरपाईच्या ‘समृद्धी’साठी आमराईची शक्कल

औरंगाबाद जिल्हय़ांतून समृद्धीचा मोठा भाग जात आहे.

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद | Updated: April 21, 2017 1:25 AM

कलम केलेला आंबा असेल आणि जर तो उत्पादनक्षम असेल तर एका झाडामागे सरासरी २० हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते.

औरंगाबाद व जालना जिल्हय़ांतून जाणाऱ्या संकल्पित समृद्धी मार्गावर सध्या आंबा लावण्याचा सपाटा गावोगावी सुरू झाला आहे. सरकारने जमीन घेतलीच तर झाडांचे अधिकचे पैसे मिळावे, यासाठी शेतकरी आमराई लावत आहेत. औरंगाबाद शहराच्या हद्दीबाहेर आंब्याची रोपे विकणारे आंध्र प्रदेशातील अनेक रोपविक्रेते दाखल झाले आहेत. मराठवाडय़ात गेल्या काही वर्षांत आंबा लागवड वाढली आहे. सध्या हे प्रमाण १९ हजार हेक्टपर्यंत आहे. समृद्धी मार्गात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांनी रोपलागवड सुरू केली आहे. २ वर्षांपासून ते अगदी फळधारणा लगेच होईल, असे रोपही मिळत असल्याने झाडांमधील गुंतवणूक वाढत आहे.

औरंगाबाद व जालना जिल्हय़ांतून समृद्धीचा मोठा भाग जात आहे. वडखा, वरुडकाझी, जयपूर या गावांसह औरंगाबाद व जालना जिल्हय़ांत आमराई उभारण्याची प्रक्रिया सध्या जोरदारपणे सुरू आहे. शासकीय रोपवाटिकांमधून केवळ एक किंवा २ वर्षांपर्यंतची रोपे ५० रुपयाला एक याप्रमाणे मिळतात. या रोपांना जारवा अधिक असतो. म्हणजे रोपांना मुळांची संख्या अधिक असते. त्यामुळे रोपे मरण्याचे प्रमाण तसे कमी असते. मात्र, मोठय़ा स्वरूपातील रोपे मिळत असल्याने एक हजार रुपयांना एक मोठे रोप आणून ते समृद्धीच्या संकल्पित रस्त्यावर लावले जात आहे.

नोंदणीकृत शासनमान्य रोपवाटिकेतून रोपे आणल्याची पावती, सातबारावर फळपिकांच्या नोंदी, गावचे तलाठी तसेच सरपंच व शेजाऱ्यांचा पाहणी अहवाल या आधारे झाडांची मोजणी केली जाते. काही वेळा झाडांचे वय मोजण्यासाठी त्याचे खोड काढून त्यातील वर्तुळाच्या आधारे त्याचे वय काढले जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये कृषी अधिकाऱ्यांना हाताशी धरूनही बरेच घोळ घातले जातात.  मात्र आता जीपीएसच्या माध्यमातून महिनावार झाडांचे फोटो मिळतात. त्यामुळे फार फार तर रोपांचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील. मोठय़ा वयाचे रोप आणून अचानक कोणी लागवड करत असेल तर त्यांना रक्कम मिळण्याची शक्यता कमी असल्याचे तालुका कृषी अधिकारी अशोक कोल्हे यांनी दिली.

समृद्धी मार्गाच्या संयुक्त मोजणीच्या कामाचे प्रमुख आर. व्ही. आरगुंडे म्हणाले, की आम्ही संयुक्त मोजणीमध्ये शेतात जे दिसते त्या प्रत्येक बाबीची नोंद करतो. घर, विहिरी व झाडे याची नोंद घेतली जाते. झाड किती वर्षांचे व त्याची नुकसानभरपाई किती हे पाहणे कृषी विभागाचे काम आहे. या सर्व प्रक्रियेची माहिती नसणारे शेतकरी दोन पैसे अधिकचे मिळावे म्हणून आंबा लागवड करीत आहेत. अशी लागवड केल्याने फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होईल, असे अधिकारी सांगत आहेत.

सारे उघडे पडेल..

कलम केलेला आंबा असेल आणि जर तो उत्पादनक्षम असेल तर एका झाडामागे सरासरी २० हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. तसेच जर कोयीपासून आंबा आलेला असेल आणि झाडाचे वय जर १२ वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्यास ८० ते एक लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. सरासरी मिळणारी ही नुकसानभरपाईची किंमत वाढावी म्हणून शेतकऱ्यांनी आमराईची शक्कल लढवली आहे. मात्र, जीपीएस प्रणालीद्वारेही जमिनीचे मोजमाप होणार असल्याने त्यात हे सारे उघडे पडेल, असे अधिकारी सांगत आहेत. जीपीएसद्वारे पीक पाहणी न्यायालयात ग्राहय़ धरली जाते की नाही, याविषयी शंका असल्याने नुकसानभरपाईसाठी जुन्याही कार्यपद्धतीचा अवलंब केला जात आहे.

First Published on April 21, 2017 1:25 am

Web Title: mango farming at mumbai nagpur samruddhi expressway