मराठा समाजाने आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणाबाहेरच्या गोष्टीचा विचार करायला हवा. तरच समाजाची प्रगती होईल, असे मत व्याख्याते आणि राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी येथे व्यक्त केले. औरंगाबाद येथे मराठा बिझनेस परिषद या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजातील काही तरुणांनी एकत्र येत व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘मराठा बिझनेस नेटवर्क’ अप्लिकेशन तयार केले आहे. रविवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात ते लॉन्च करण्यात आले.

मराठा मोर्चाची सुरुवात औरंगाबादमधून झाली. त्या मोर्चाने घालून दिलेल्या नियमानुसार, त्यानंतर राज्यभरात ५७ मोर्चे झाले. प्रत्येक ठिकाणी शांतता, स्वच्छता, शिस्त आणि महिलांचे अग्रणी स्थान कायम राहिले. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबई येथील मोर्चातही हे नियम पाळले जातील. मात्र, आरक्षणासोबत आरक्षणाबाहेरील गोष्टींचाही मराठा समाजातील तरुणांनी विचार करायला हवा. त्यासाठी औरंगाबादमधून सुरु झालेली. उद्योग वयवसायची ही चळवळ मोठी होणे गरजेचे असल्याचे मत प्रदीप सोळुंके यांनी वयक्त केले. हा विचार घेऊन तरुण पुढे चालले तर प्रगती नक्की होईल असेही ते म्हणाले. मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, असे बोलले जाते. मात्र, अनेक मराठी माणसांनी यशस्वी उद्योग केले आहेत. उद्योगासाठी आपली मानसिकता बनवून, त्यासाठी मेहनत घ्यावी असे मतही त्यानी मांडले.

शेती तोट्यात आहे, त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेला समाज आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. ही आर्थिक कोंडी फोडायची असेल, तर उद्योगाला चालना मिळाली पाहिजे. त्यासाठी मराठा बिझनेस नेटवर्कची स्थापना करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काही तरुणांनी एकत्र येत रयत ट्रेडिंग कंपनीची स्थापना केली. रयतच्या माध्यमातून भारतातला पहिला कन्स्ट्रक्शन साहित्याचा मॉल औरंगाबादमध्ये असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची या परिषदेला उपस्थिती होती.