वामनदादांच्या १०० गाण्यांना शास्त्रीय संगीताचा साज

गदिमा आणि वामनदादा कर्डक सांस्कृतिक अंगाने दोन टोकावरचे कवी. पण श्रद्धेच्या पातळीवरील त्यांची अभिव्यक्ती एका समान रेषेवर येऊन थांबणारी. पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एकाला भावला आणि दुसरा कवी क्रांतिसूर्याची गाणी गाणारा. कधी रोकडा सवाल घेऊ न व्यवस्थेला प्रश्न विचारणारा तर कधी मनाच्या तरलतेला साद घालत शोषितांचे जिणे बदलून टाकणाऱ्या महामानवाचे आयुष्य, कवितांमध्ये पकडू पाहणारा. दोघेही तेवढेच सशक्त. पण हे सगळे का सांगायचे?, कारण ‘गीतरामायणा’प्रमाणे औरंगाबादमध्ये आता ‘गीत भीमायण’ अशी रचना केली जात आहे. वामनदादा कर्डकांनी लिहिलेल्या दहा हजार गीतांमधून बाबासाहेबांचे आयुष्य आणि विचार मांडू शकणारी १०० गाणी निवडण्यात आली असून, गेल्या दोन वर्षांपासून सरस्वती भुवनमधील संगीत विभागाचे प्रमुख डॉ. संजय मोहड या कामात गढून गेले आहेत. कविता कृष्णमूर्ती, हरिहरन, रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर-टिकेकर, साधना सरगम, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, रवींद्र साठे यांसह आघाडीचे गायक आता ‘गीत भीमायण’मध्ये गात आहेत. शास्त्रीय संगीताचा बाज आणि बाबासाहेबांची विचारज्योत, असे अनोखे मिश्रण असणारे ‘भीमायण’ पूर्ण व्हायला आणखी वर्षभराचा कालावधी लागेल. आता ४० गाणी तयार झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे.

वामनदादांची कविता थेट रोकडा सवाल घेऊन येते.

‘सांगा आम्हाला बिरला,

बाटा, टाटा कुठे हाय हो,

सांगा धनाचा साठा अन्

आमचा वाटा कुठे आहे हो’

व्यवस्थेला प्रश्न विचारणारी त्यांची कविता बाबासाहेबांचे चरित्र सांगताना मात्र कमालीची मृदू होते. कधी त्यात कारुण्य असते, कधी संघर्ष डोकावतो, तर कधी बाबासाहेबांनी शोषितांच्या जगण्यावर केलेल्या परिणामांची महती सांगणारी असते. अशा कवितांना चाल देताना शास्त्रीय संगीताचा राग निवडणे डॉ. मोहड यांच्यासमोरचे आव्हान होते. ‘बिभास’ रागात सुरेश वाडकर यांनी गायिलेलं भीमगीत ऐकतच राहावे, असे आहे.

‘कानात काल माझ्या,

माझे मरण म्हणाले,

तन-मन तुलाच आता,

आले शरण म्हणाले,

कोटी उपासपोटी,

धरिलेस तूच पोटी

झाले तुझ्या कुळाचे,

शुद्धीकरण म्हणाले’

गदिमा आणि वामनदादांच्या आयुष्यात आर्थिक दारिद्रय़ अगदी समान पातळीवर होते. माडगूळ गावातून कविता करणारे गदिमा तसे एका ठिकाणी राहून महाराष्ट्रभर पोहोचले. वामनदादा गावोगावी फिरले आणि महाराष्ट्राचे झाले. त्यांनी घरोघरी भीमगीते पोहोचवली. १९२० साली बाबासाहेबांनी जेव्हा ‘मूकनायक’ काढले तेव्हाच्या कालखंडावर वामनदादा लिहितात,

‘मी मूकनायक, मी मुक्यांची वाणी, मी मुक्यांची गाणी

मी मार्गदाता, मीच गायक,

मी मूकनायक’

भिन्न षड्जमधील बांधणी असणारे हे गीत हरिहरन या आघाडीच्या गायकाने म्हटले आहे. वामनदादांची कविता बाबासाहेब समजावून सांगताना किती मृदू होते, आदराने ती कशी ओतप्रोत भरलेली असते, हे सांगणारे गीत ‘तिलककामोद’ रागात कविता कृष्णमूर्तीनी म्हटले आहे.

‘चांदण्याची छाया, कापराची काया, माउलीची माया, होता माझा भीमराया’

चोचीतला चारा, देत होत सारा

मायेचा उबारा, देत होत सारा

भीमाईपरी चिल्यापिल्यावरी

पंख पांघराया, होता माझा भीमराया’

रामायणातील नाटय़ हा गदिमांच्या ‘गीतरामायणा’चा केंद्रबिंदू होता. त्यांची भाषा संस्कारी, सफाईदार, अभिजाततेकडे नेणारी. त्यामुळेच संगीतातील शास्त्राला पूरक आणि पोषक बांधणी सुधीर फडके यांना करता आली असावी. वामनदादांची कविता काहीशी ग्राम्य, पण मानवीपणाच्या कक्षा रुंदावणारी, समाजपरीघ विस्तारणारी, विचारांच्या पातळीवर काहीशी प्रचारकी. बाबासाहेब आणि त्यांचे विचार समजावून सांगणारी. त्यामुळे या कवितांना चाल देणे हे खरे तर अवघड काम. पण डॉ. संजय मोहड यांनी हे काम अतिशय रेखीवपणे केले आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग गाण्यातून मांडताना वामनदादांना काय अभिप्रेत होते आणि त्याला संगीतातला कोणता राग उपयोगी पडू शकेल, हे लक्षात घेऊन तब्बल दोन वर्षांपासून ते काम करत आहेत. बाबासाहेबांचे लग्न भायखळ्याच्या मंडीत झाले, तो प्रसंग वामनदादांनी मोठय़ा छान शब्दांत लिहिला आहे.

‘भायखळ्याच्या मंडीमधले चबुतरे सजले,

शुभमंगल झाले, झाले भीमाचे शुभमंगल झाले’

याच गाण्याच्या शेवटच्या कडव्यात ते लिहितात,

‘माय प्रेरणा झाली वामन, उभ्या समाजाची रमा जाहली अमर सावली, माझ्या भीमरायाची

कर्पूरवडी झाले, झाले शुभमंगल झाले’

साधना सरगम यांनी हे गीत म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त ‘भीमायणा’चा संकल्प डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला आणि त्यांना वेगवेगळ्या सर्जनशील व्यक्तींनी साथ दिली. संगीत संयोजन नरेंद्र भिडे यांनी केले आहे. पुढची काही गाणी राजन-साजन मिश्रा, शौनक अभिषेकी, राशिद खान, आशा भोसले, शंकर महादेवन, सोनू निगम यांच्याकडून गाऊन घेतली जाणार आहेत. बहुतांश गाण्यांना पद्मश्री विजय घाटे यांनी तबल्यावर साथसंगत केली आहे.

‘गीतरामायणा’मध्ये प्रभू रामचंद्राची आयुष्याची चरित्रकथा गाण्यातून उलगडत जाते. तशी बाबासाहेबांच्या आयुष्यावरची ही चित्रकथा नाही तर त्यांच्या विचारांसह माणूसपणाच्या कक्षा विस्तारणारा संदेशही ‘भीमायणा’मधून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सांस्कृतिक उन्नयनाची शिडी

  • डॉ. संजय मोहड म्हणाले, १९९७ साली परभणीच्या बसस्थानकावर वामनदादांची पहिली भेट झाली होती. तोपर्यंत त्यांची गाणी तशी अपरिचितच.
  • नंतर बँकेतली नोकरी सोडून गाडगेबाबा महाराज विद्यापीठात नोकरीत असताना वसमतचे संगीतातले गुरू शिवहर डांगे, विश्वनाथ गिरगावकर, सूरमणी दत्ता चौगुले यांच्याकडून घेतलेल्या संगीताच्या संस्काराच्या आधारे या चाली बांधल्या आहेत.
  • सांस्कृतिक पातळीवर हे मोठे उन्नयन असेल. साहित्य, संगीत या क्षेत्रात सांस्कृतिक वर्चस्ववादाची एक शिडी असते.
  • त्या शिडीच्या वरच्या टोकाला पोहोचता यावे, असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते.