गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याच्या मागे कचऱ्याचा ढीग, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानीची पालिकेकडून प्रतारणा

मराठवाडय़ाच्या विकासाचा महामेरू अशी बिरुदावली सन्मानाने ज्यांच्या नावामागे लावली जाते त्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूस महापालिकेने पोत्यात भरलेला कचरा साठविला आहे. हा क्लेशदायी प्रकार पैठण गेट येथे होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीदरम्यान समोर आला. पैठण गेटला असणाऱ्या पडवींमध्ये कचरा वाहून नेणाऱ्या गाडय़ांसह पोत्यात भरलेला ओला आणि सुका कचरा गोळा करून ठेवण्यात आला आहे. परिणामी गोविंदभाईंच्या पुतळ्याभोवती दुर्गंधी पसरली आहे. शहराच्या मध्यभागी मराठवाडय़ाचा मानबिंदू असणाऱ्या गोविंदभाईंची ही प्रतारणा महापालिकेकडून केली गेली आहे.

औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाला अक्षरश: चार महिने लोटले आहेत. त्यानंतरही कचऱ्याचा प्रश्न मनपा प्रशासनाला सोडवता आलेला नाही. यापूर्वी कचऱ्याचा प्रश्न औरंगाबादचे खंडपीठ ते मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत चर्चिला गेला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर या प्रश्नी औरंगाबादकरांची माफी मागितली. तरीही सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवता आलेला नाही. याप्रश्नीच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यासारख्या प्रशासकीय यंत्रणेतील प्रमुखांची बदलीही या कचऱ्याच्या प्रश्नामुळे झाली. नवे आयुक्त आले. त्यांनाही येऊन आता महिना उलटला. तरीही रस्त्यावर कचरा नाही, असे दृश्य अजूनही पाहायला मिळाले नाही. कचरा प्रश्न  लवकरच मिटेल, अशा केवळ वल्गना ठरत आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी चार दिवसांपूर्वी सांगितलेल्या माहितीनुसार तेव्हा तीन हजार टन कचरा रस्त्यावर होता. पैठण भागातील कचरा साठवण्यासाठी मनपाच्या यंत्रणेला अन्य कोणतेही ठिकाण सापडत नसल्यामुळे त्यांनी पद्मविभूषण, स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळा परिसरातील पडवी शोधल्याने आपण गोविंदभाईचे महत्त्व कमी करीत आहोत  हे मनपाच्या कचरा संकलनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजलेले नाही.

या अनुषंगाने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भगवानराव देशपांडे म्हणाले, ही लोकमान्य टिळकांची आणि गोविंदभाई श्रॉफ यांची एकप्रकारे प्रतारणाच आहे. सत्ताधाऱ्यांना सामाजिक आणि राजकीय भान नसल्याचे हे निदर्शक आहे.