..मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचा सवाल

डोळ्यांत कमालीचे नैराश्य. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पीक जळत असल्याची काळजी स्पष्टपणे दिसणारी. वयाच्या ८० व्या वर्षी ‘सगळा संसाराचा गाडा ओढायचा कसा,’ असा प्रश्न रघुनाथ नरवडे यांना पडलेला. घरात पत्नी, तीन सुना, मुले, नातवंडे. तीन जनावरे- दोन भाकड म्हशी आणि दूध देणारी एक गाय. साडेतीन एकरांत लावलेला कापूस जळताना पाहण्याशिवाय नरवडे या शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नाही. विहीर कोरडी पडली आहे. बाजरी खुरटली आहे. फक्त १३ हजारांचे कर्ज असणारे नरवडे सांगत होते, या वर्षी १५ हजार रुपये खर्च केला. सारा पैसा वाया जाणार आहे. जगायचे कसे, असा प्रश्न ते स्वत:ला विचारतात आणि शांत होतात.

माळरानात कापसाला लागलेली पिवळी फुले अधिक कोमेजली आहेत. पीक येण्याची शक्यता धूसरच. नरवडेंसारख्या अनेक शेतकऱ्यांनी शेतात येणेही बंद केले आहे. साऱ्या शिवारात सुन्न करणारी शांतता!

पैठण तालुक्यातील साडेतीन हजार एकरांवरील पेरा आता शेतकऱ्यांनी मोडून काढला आहे. जायकवाडीच्या धरणाशेजारच्या गावांना तसे पाणी नाहीच. १०-१२ जूनच्या आसपास पेरणी केलेली. नरवडेंची दोन्ही मुले शेती करणारे. पाच बॅग कापसाचे बियाणे आणले. पेरले तेव्हा हे वष्रेही चांगले जाईल, अशी आशा होती. पण घडले वेगळेच.

पावसाने दडी मारली. अपेक्षित सरासरीच्या अर्धा पाऊसही झाला नाही. नरवडे यांच्या आडूळ खुर्द भागातील पिके जळाली. जवळ असणाऱ्या त्यांच्या अब्दुलापूर शिवारातील अवस्थाही अशीच. एका गायीचे दूध, सगळा संसार कसा तारणार? पीक येणार नाही असे दिसल्यावर खत देण्याचे नरवडे यांनी टाळले. औषध फवारणीचा खर्चही केला नाही. पिकांची वाढ झालीच नाही. सारे हातून गेले आहे.

पारुंडी शिवारात १६ एकरांत पाण्यासाठी धडपडणारे बप्पासाहेब इरकल म्हणाले, पाच विहिरी आणि दोन विंधन विहिरी घेतल्या. एक शेततळे घेतले. त्यात मेणकापडही टाकले. पण पाणी काही पुरले नाही. चार किलोमीटरवरून जलवाहिनीसाठी ९ लाख रुपये कर्ज काढले. कर्जमाफीचा अर्ज भरला. पण उर्वरित रक्कम भरण्यासाठी पैसेच नव्हते. एका मोठय़ा गर्तेत सापडल्यासारखी इरकल यांची अवस्था झाली आहे. आता मजूर लावून शेती करणे परवडणारे नसल्याने पत्नी आणि वडिलांसह ते कापसाची मशागत करीत होते. येत्या चार दिवसांत पाऊस आलाच तर.. या आशेवर ते दिवस ढकलत आहेत. मराठवाडय़ातील अनेक गावांत अशीच अवस्था आहे. दुष्काळ दारात उभा आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जातो आहे, ‘जगायचे कसे?’