औरंगाबाद/नांदेड : वळदगाव शिवारातील एका मतिमंद मुलांच्या विशेष शाळेतील मुलीची छेड  काढून त्याची चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी चालकाला रविवारी अटक केली. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एका अल्पवयीन बालकाकडून व्हिडीओ असलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अविनाश कैलास शेजूळ याला अटक केली आहे. तसेच शेजूळ आणि अल्पवयीन बालकाकडून जप्त केलेले मोबाइल फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. नांदेड येथील सातवीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपींना अटक करावी म्हणून सोमवारी बंद पाळण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे मराठवाडय़ात खळबळ उडाली आहे.

शंकरनगर येथील सातवीच्या विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी शंकरनगर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे आदेश देणारे पत्र महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पाठविले आहे. या गंभीर प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झाली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दोन महिन्यांपूर्वीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील नृत्याचे व्हिडीओ दाखवत सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आले. हा प्रकार तब्बल महिनाभर सुरू होता. या प्रकरणी प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, सहशिक्षक स.रसूल, दयानंद राजुळे, स्वयंपाकी सुरेखा बनसोडे या पाच जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात बाललैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना १७  जानेवारी रोजी उघडकीस आली. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मुख्याध्यापकाकडे तक्रार करण्यात आली होती; परंतु प्रकरण दडपण्याच्या दृष्टीने संबंधितांनी तिच्या आईला धमकावत त्यांनी हे प्रकरण कोणालाही सांगू नये, यासाठी मुद्रांकावर जबरदस्तीने शपथपत्र लिहून घेण्यात आले; परंतु प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी शंकरनगर बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शंकरनगरमध्ये १०० टक्के बंद पाळण्यात आला. या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

नोटरीचा परवाना रद्द करावा

या गंभीर प्रकरणाची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पत्र पाठवून घटनेतील आरोपींना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, पीडित मुलीच्या आईच्या अशिक्षितपणाचा लाभ घेत तिच्याकडून जबरदस्ती मुद्रांकावर शपथपत्र लिहून घेण्यात आले व ते नोटरी करण्यात आले. या नोटरीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, तसेच मनोधर्य योजनेअंतर्गत पीडित मुलीला मदत मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे गोऱ्हे यांनी पत्रकात म्हटले आहे.