मराठवाडा जनता विकास परिषदेचा इशारा

मराठवाडय़ात मंत्रिमंडळाची बैठक पूर्वीप्रमाणे घेण्यात यावी, तसेच या बैठकीपूर्वी मराठवाडा जनता विकास परिषदेला चर्चेसाठी वेळ द्यावा. वारंवार पत्रव्यवहार करूनही मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून वेळ दिली जात नसल्याने त्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत मराठवाडय़ातील सर्व जिल्हा आणि तालुका पातळीवर निदर्शने केली जातील, असा इशारा मराठवाडा जनता विकास परिषदेने दिला आहे.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त एप्रिल २०१५ मध्ये मुख्यमंत्री आले असता मराठवाडा जनता विकास परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. तेव्हा विकासकामासाठी चर्चेस वेळ देऊ, असे त्यांनी कबूल केले होते. या घटनेला सव्वा वर्षे होऊन गेले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे वारंवार निवेदने पाठविली. मात्र, त्यांचा वेळ मिळाला नाही. मराठवाडय़ाच्या पाणी व विकास प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही, यावरून मुख्यमंत्र्यांचा मराठवाडय़ाबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट होत असल्याचेही दिसून येते, असेही मराठवाडा जनता विकास परिषदेने म्हटले आहे. १७ सप्टेंबरपूर्वी वेळ देण्याविषयी निर्णय झाला नाही तर मराठवाडय़ाला डावलण्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे मतही परिषदेच्या कार्यकारिणीत व्यक्त करण्यात आले.

या बैठकीत माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, माजी आमदार डी. के. देशमुख, पंडितराव देशमुख, अॅड. रामचंद्र बागल, विनायक चिटणीस, गोपीनाथराव वाघ, प्राचार्य जीवन देसाई, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तारा लढ्ढा यांची उपस्थिती होती.