नेत्यांचे हवाईदौरे वाढले; आरोप-प्रत्यारोपात समस्या बाजूलाच; अनेक ठिकाणी सोयीस्कर आघाडय़ा ; मराठवाडा पालिका निवडणूक

मराठवाडय़ात पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या नगरपालिका आपल्याच ताब्यात राहाव्यात यासाठी नेत्यांची हेलिकॉप्टर फेऱ्या वाढू लागल्या आहेत. उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्हय़ांत नगरपालिका निवडणुकीत रणधुमाळी अधिकआहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी दौरे करताना दिसत आहेत. तुलनेने पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या फारशा सभाही नाहीत. त्यांच्या सभांना तशी मागणीही नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही प्रचारात उतरले आहेत. प्रचाराच्या राडय़ात मराठवाडय़ात पकडण्यात आलेल्या नोटांच्या पाश्र्वभूमीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीमध्ये सापडले आहेत.

नांदेड, औरंगाबाद व लातूर या जिल्हय़ांत उमेदवारी भरण्यास आता सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये प्रचारात भाजपची नेतेमंडळी दिसत असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभागातील बांधणीवर भर दिल्याचे दिसून येत आहे. परळी नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी खासाच वेळ काढला आहे. धनंजय मुंडे यांच्या १६ जिल्हय़ांत ३८ सभा झाल्या आहेत, तर पकंजा मुंडे यांच्या १२ जिल्हय़ांत ३१ सभा झाल्या आहेत. मुख्यमंत्रीही प्रचारात उतरले आहेत. बुधवारी त्यांनी उस्मानाबाद, वसमत आणि परळीमध्ये सभा घेतल्या. रस्ते, गटारी, पाणीपुरवठय़ाच्या योजनांवर प्रचारात फारसे कोणी बोलत नाही. आपणच अधिक निधी आणू शकतो, असा दावा मात्र केला जातो आहे. आणलेला निधी कसा खर्च होतो आणि शहरातील समस्या सोडविण्यासाठी त्यात कसे बदल केले जातील, यावर मात्र प्रचारात फारसा जोर नाही. आरोप-प्रत्यारोपाची राळ कधी नोटाबंदीपर्यंत जाते तर कधी गावातील भाऊबंदकीच्या राजकारणापर्यंत. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ांत त्याचा प्रत्यय मतदारांना येत आहे.

कुटुंबातील राजकारण

उस्मानाबाद नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आतेभाऊ अमोल पाटोदेकर यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरविले. त्यामुळे त्यांच्या जवळचे अमरसिंह देशमुख नाराज झाले. राष्ट्रवादीत बंडाळी आहे. तसेच सेनेतही घडले आहे. न्यायालयीन प्रकरणात गुंतलेले पूर्वी राष्ट्रवादीत असणारे मकरंद राजेनिंबाळकर यांना सेनेने नगराध्यक्षपदाचा उमेदवार केल्यामुळे तेथेही नाराजी आहे. भाजपचे नितीन काळेही रिंगणात आहेत. चौरंगी लढतीत सत्ता मिळविण्यासाठी नात्यागोत्याच्या राजकारणाचा फायदा उचलला जात आहे. तुळजापुरात राष्ट्रवादीच्या विरोधात आमदार मधुकरराव चव्हाण यांनी काँग्रेस-भाजप-सेना यांच्याबरोबर युती केली आहे.  काँग्रेसने नळदुर्ग, मुरुम व उमरगा येथे जोर लावला आहे. ओवेसींच्या सभांचा परिणाम दिसू लागला आहे. हिंगोलीत प्रकाश आंबेडकर, ओवेसी, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या सभा झाल्या आहेत. वसमत, कळमनुरी आणि हिंगोली या तीनही नगरपालिकेत सत्ता मिळावी यासाठी काँग्रेस आणि भाजप-सेना प्रयत्नशील आहेत. कळमनुरी नगरपालिकेत भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या उमेदवारांनी युती केली आहे.

जालना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली. शिवसेनेचा उमेदवारच नव्हता. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी आमदार कैलास गोरंटय़ाल यांच्या पत्नी संगीता यांच्या विरोधात भाजप-सेनेला शकुंतला कदम या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला.

परळीत मुंडे बहीण-भावांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबीयांतील संघर्ष टिपेला गेला आहे. परभणी जिल्ह्य़ात बाबाजानी दुर्राणींनी पाथरी नगरपालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसकडून प्रचारसभा घेण्यासाठी तसे मोठे नेते कोणी फिरकले नाही. अशोकराव चव्हाण एकटेच प्रचाराची बाजू लढवत आहे. चंद्रकांत हंडोरे, नसीमखान, प्रकाश आंबेडकर, असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना तशी गर्दी झाली. पण या निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी पैसे दिल्याचे प्रकारही आढळून आले. बीडमध्ये काँग्रेसच्या एका उमेदवारावर असा आरोपही झाला. उमरगा आणि तुळजापूर येथे मोठय़ा प्रमाणात रोकड पकडली गेली. नोटाबंदीवरून चर्चा सुरू असताना निवडणुकीतही नव्या गांधीबाबांची चर्चा चांगलीच रंगली आहे. नगरपालिका निवडणुकीत शहराच्या समस्यांचे विषय मात्र वळचणीलाच आहेत.

जालना येथे नगराध्यपदासाठी पक्षाचे अधिकृत चिन्हच नसल्यामुळे येथील निवडणुकीत वेगळेच रंग भरले गेले. त्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कारणीभूत असल्याचा आरोप राजेंद्र बागडी या भाजपच्या कार्यकर्त्यांने केला. या अनुषंगाने थेट अमित शहांपर्यंतही रावसाहेब दानवे यांच्या तक्रारी करण्यात आल्या. परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरविले. तर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनीही त्यांच्या पत्नीला उभे केले आहे.