औरंगाबाद : करोनामुळे रुग्णाची संख्या वाढत असतानाच रुग्णालयात लागणाऱ्या साहित्याची गरज आता पुढे आली आहे. मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांमध्ये २६० व्हेंटिलेटर दोन लाख २३ हजार ‘पीपीई’ आणि चार लाख २२ हजार ६०० एन-९५ मास्कची आवश्यकता असल्याची मागणी विभागीय प्रशासनाने हाफकीन जीव औषध महामंडळाच्या व्यवस्थापकाकडे नोंदविली आहे. यातील ‘मास्क’ आणि ‘पीपीई’ च्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आंदोलन करून आरोग्यमंत्र्यांशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला होता.

गेल्या काही दिवसांपासून नक्की किती उपलब्धता होऊ शकते, या विषयीचे गणिते सुरू होती. खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा आढावा घेण्यात आला होता. प्रसंगी ते व्हेंटिलेटर ताब्यात घेता येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र आता मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, नांदेड, बीड या आकाराने आणि लोकसंख्येने अधिक असणाऱ्या तसेच कमतरता असणाऱ्या जिल्ह्यात अनुक्रमे ५० व ४०  एवढी व्हेंटिलेटरची गरज आहे. परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी २५ व्हेंटिलेटरची गरज आहे. त्याच बरोबर पीपीईची मागणी मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रत्येकी ४० हजार परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात प्रत्येकी १५ हजार पीपीईची गरज असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मागणी पत्रात नमूद केले आहे. मोठय़ा प्रमाणात एन-९५ ची मागणी करण्यात आली आहे. सुमारे चार लाख २२ हजार मास्क लागतील तसेच त्रिस्तरीय मास्कची गरज चार लाख ५० हजार एवढी गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आता बँकांसमोर गर्दी

गेल्या काही दिवसांत भाजी बाजारात होणारी गर्दी आता बँकासमोर दिसत येत असून गेल्या महिन्यातील वेतन, अनुदानाची आणि निवृत्तिवेतनाची रक्कम काढून  घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली जात आहे. जनधन खात्यांमार्फत केंद्र सरकारने रक्कम दिली असल्याने ती रक्कम काढून घेण्यासाठी गर्दी केली जात आहे. काही शाखांसमोर ग्राहकांनी अंतर ठेवून उभे राहण्याचीही तसदी घेतली नाही. बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी ही बाब प्रशासनाच्या पूर्वीच लक्षात आणून दिली होती.

स्वस्त धान्य दुकानांसमोरही रांगा

शहरातील काही भागात रास्त भाव दुकानातून धान्य घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. काही दुकानदारांनी अंतर ठेवून ग्राहकांनी उभे राहावे, असे आवाहन केले. काही ठिकाणी हे काम पोलिसांना करावे लागले.