‘जीवाला धोका आहे’, असं डोळ्यांत पाणी आणून दूरचित्रवाहिन्यांवर सांगणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया गेल्या आठवाडय़ात औरंगाबादेत आले तेव्हा सातशे-साडेसातशे पोलिसांचा बंदोबस्त होता. ते परभणीला जाऊन आले आणि नंतर औरंगाबादमध्ये पत्रकार बैठक घेऊन म्हणाले, ‘देशाचे आरोग्य ‘आयसीयू’मध्ये आहे.’ त्यांचे हे वक्तव्य ज्या दिवशी प्रकाशित होणार होते त्या दिवशी नेमके केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा शहरामध्ये कर्क रुग्णालयात एका कार्यक्रमासाठी आले होते. अर्थात तोगडियांनी केलेल्या वक्तव्याचा आणि नड्डा येण्याचा केवळ ‘योगायोग’च असावा. पण या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील एक धार्मिक कार्यक्रमातून देशाची मानसिकता घडविणारी एक संघटना आरोग्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधत होती. मंत्री नड्डा यांनी मात्र, भारतातील आरोग्य सेवा अमेरिका आदी प्रगत राष्ट्रांपेक्षा चांगली असल्याचा दावा केला. तेव्हा दोन नेत्यांच्या वक्तव्यातील मोठी दरी जाणवणारी होती.

धार्मिक क्षेत्रात आक्रमकपणे काम करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी देशाचे आरोग्य कसे ‘आयसीयू’मध्ये हे सांगण्यासाठी रिक्त पदांचा आकडा समोर ठेवला. शेतकरी मरत आहे, असेही ते म्हणाले. आरोग्य आणि कृषी विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत तोगडिया यांनी डागलेली तोफ सरकारविरोधी होती. त्यांनी परभणीमध्ये सरकारला राम मंदिर बांधण्यासाठी निवडून दिल्याची आठवण करून दिली. तेव्हा दुफळी माजवणारी फट अधिक रुंदावली असल्याचे स्पष्ट संकेत तोगडिया देत होते.

अशीच सांध राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातही दिसून आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. गंगापूर सहकारी साखर कारखाना खासगी व्यक्तीकडे देऊ नये, अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचे काही जण ओरडून सांगत होते. तेव्हा व्यासपीठावर जयंत पाटील यांची उपस्थिती होती. हा कारखाना त्यांनीच घेतल्याचे सांगण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. केवळ कारखाना कोणाकडे असावा, एवढय़ापुरता हा वाद नव्हता तर राष्ट्रवादीतील प्रस्तावित संघटनात्मक बदलाची झालरही त्या वादाला होती का, अशी शंका घेतली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील फट ही वाढत जाणारी तर नाही ना, असे विचारत त्या गोंधळाची चर्चा राष्ट्रवादीमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

काँग्रेसमध्येही अशीच मोठी फट निर्माण करण्याचं काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच केले. राजेंद्र दर्डा यांना औरंगाबादच्या प्रशिक्षण शिबिरात बोलवल्यानंतर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आस लावून असणारे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले. पण जाहीरपणे बोललो तर बऱ्याच अडचणी येतील म्हणून संघटनेतील ही फट जणू निर्माण झालीच नाही, असे दाखविण्याचा प्रकार काँग्रेसमध्ये सुरू आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मराठवाडय़ाचा दौरा केला. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना पाठबळ देण्यासाठी ठाकरे यांनी केलेला हा दौरा ध्वनिक्षेपक खराब असल्याने तसा राजकीय पटलावर फारसा गाजला नाही. पण तत्पूर्वी त्यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रामदास कदम आणि चंद्रकांत खरे यांच्या वादातून निर्माण झालेली दुफळी दूर करण्यासाठी रामदास कदम यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली. त्यामुळे सेनेकडून ती फट सांधली गेल्याचे चित्र आहे.  राजकीय आखाडय़ात निर्माण झालेल्या फटी बुजविणारे नेते मराठवाडय़ात फड रंगवू पाहत होते तेव्हा येथील माणूस मात्र नव्याच संकटात सापडत गेला. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. आता नव्या संकटात स्वप्रतिमा उजळविण्यासाठी नेते नवा खेळ मांडत राहतील.

नारायण राणे यांचे उसने आवसान

राजकीय आखाडय़ात बळ एकवटून आलेल्या नारायण राणे यांनी मात्र सेनेच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. त्यांच्या पक्षाची नोंदणी अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. मात्र, तत्पूर्वी ‘जे बोलू ते करू’, असे पक्षाचे घोषवाक्य असेल, असे सांगत त्यांनी सेनेवर टीका केली. आक्रमक स्वभावाचे राणे मराठवाडय़ात त्यांची राजकीय ताकद शोधू पाहत आहेत. त्याला ते जातीचा आधारही शोधत आहेत. मराठा समाजाला आरक्षण का द्यावे, याची कारणमीमांसा सरकार दरबारी करणारे ते प्रमुख सदस्य होते. त्या आधारे मराठवाडय़ात पाय पसरता येतात का, याची चाचपणी त्यांनी केली खरी; पण त्यांचे बळ तसे नाही आणि मराठवाडा पातळीवर काम करण्यासाठी त्यांना उसने आवसान आणावे लागत होते. त्यांच्या सभेला आलेली संख्या हे सांगण्यास पुरेशी होती.