उस्मानाबादेत मुलींच्या संख्येत घट ; राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातील नोंदी
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील मानवी विकासाच्या निर्देशांकाबरोबरच महिलांचे जीवनमानदेखील मागास असल्याचे समोर आले आहे. मराठवाडय़ातील महिलांच्या वाटय़ाला येत असलेले आयुष्य राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत चिंताजनक असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
यंदा राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा चौथा टप्पा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यात एकूण ८९ वेगवेगळ्या निकषांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. दर पाच वर्षांंनी केंद्र सरकारकडून देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सर्वेक्षण केले जाते. यंदा चौथ्या टप्प्यात पहिल्यांदाच देशभरातील जिल्हा स्तरावर हे सर्वेक्षण करण्यात आले. एप्रिल ते २५ सप्टेंबर २०१५ या कालावधीत जीएफके मोड प्रा. लिमिटेड या संस्थेकडून देशभरातून ही माहिती गोळा करण्यात आली.
मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांत ही माहिती नोंदविण्यात आली आहे. स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य विमा, जन्म आणि मृत्यूचे प्रमाण, विवाह, वंध्यत्व, मुलांमधील रोगप्रतिकार शक्ती, आहार, लंगिक वर्तन, कौटुंबिक हिंसा, उंची आणि वजन, हिमोग्लोबीनचे प्रमाण, रक्तातील घटकांची तपासणी अशा एकूण ८९ घटकांची जिल्हानिहाय माहिती या सर्वेक्षणात नोंदविण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ातून २६ हजार ८९० कुटुंबे, २९ हजार ४६० महिला आणि ४ हजार ४९७ पुरुषांची व्यक्तिगत स्वरूपात घेण्यात आलेल्या माहितीची कोष्टकेसुद्धा स्वतंत्रपणे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस-४) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी देशभर गाजलेल्या बीड जिल्ह्य़ाने टाकत मुलींच्या जन्मदरात चांगलीच आघाडी घेतली आहे. बीडमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण एक हजार ११३ एवढे आहे. उस्मानाबाद सर्वात मागे असून, उस्मानाबादचे मुलींच्या जन्मदराचे हजारामागे ७५२ एवढे आहे. मराठवाडय़ात मुलींच्या जन्माचे प्रमाण औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक असल्याचे नोंदविण्यात आले आहे. हे प्रमाण ११९५ एवढे आहे. त्यापाठोपाठ लातूर ९७१, हिंगोली ९६५, नांदेड, परभणी ९०५, जालना ८६१ इतके आहे.
मराठवाडय़ातील महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. परभणीमध्ये सुमारे ५० टक्के महिला रक्तक्षयाने ग्रस्त आहेत. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये रक्तक्षय असलेल्या महिलांची संख्या ४५ टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर हिंगोली आणि औरंगाबाद जिल्हा येतो. या दोन जिल्ह्य़ांतील ४२ टक्के महिला रक्तक्षयाने ग्रासल्या आहेत. लातूरमध्ये हे प्रमाण ३७ टक्के, तर उस्मानाबाद आणि बीडमध्ये ३३ टक्के एवढे आहे.

जालना, बीडमध्ये सर्वाधिक बालविवाह
बालविवाहाच्या प्रमाणात मराठवाडय़ात जालना सर्वात पुढे आहे. जिल्ह्य़ातील बालविवाहाचे प्रमाण ५३ टक्के आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडमध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ४८ टक्के मुलींचे लग्न जिल्ह्य़ात लावली जातात. त्यापाठोपाठ बालविवाहाच्या प्रमाणात हिंगोली आणि नांदेड जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिंगोलीमध्ये बालविवाहाचे प्रमाण ४२ टक्के, तर नांदेडमध्ये ४१ टक्के आहे. लातूर ३८, औरंगाबाद ३४, उस्मानाबाद ३०, तर परभणी जिल्ह्य़ात बालविवाहाचे प्रमाण सर्वात कमी २४ टक्के एवढे आहे.
जालन्यात सर्वात जास्त बालमाता
बालविवाहात सर्वात पुढे असणाऱ्या जालना जिल्ह्य़ात साहजिकच बालमातांची संख्यादेखील सर्वात जास्त आहे. यात जालना जिल्ह्यात २३ टक्क्यांहून अधिक प्रमाणात बालमाता (१५ ते १९ वयोगट) आहेत. त्या पाठोपाठ हिंगोली जिल्ह्य़ात १५ टक्के, बीड १३ टक्के, उस्मानाबाद, लातूर १२ टक्के, तर बालमातांचे प्रमाण औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्य़ात सर्वात कमी साडेदहा टक्के एवढे नोंदविण्यात आले आहे.