औंढा तालुक्यातील जवळाबाजार बाजार समितीची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली. आक्षेप प्रक्रियेअंती यादी अंतिम होईल, तर पुढच्या आठवडय़ानंतर वसमतच्या जयप्रकाश नागरी सहकारी बँक निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते. त्यामुळे जवळाबाजार निवडणुकीची चढाओढ सुरू झाली असून आता कोण कोणासोबत युती करणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
वसमत विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक निवडणुकीत दोन जयप्रकाश गट आमने-सामने आल्याने या सर्वच लहान मोठय़ा निवडणुका राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सोयीप्रमाणे युती केल्यामुळे गाजल्या. वसमत बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीविरुद्ध भाजप-शिवसेना, तर डॉ. जयप्रकाश मुंदडा बँक निवडणुकीत शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते. औंढा नागनाथ नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक मदानात उतरले. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर परिस्थितीने भाजप-शिवसेनेला एकत्र यावे लागले. शिवेश्वर बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रमुख काही पुढाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या दांडेगावकरांना जवळ केले, तर काहींनी आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्यासोबत युती केली. या निवडणुकीत दांडेगावकर गटाने बाजी मारली.
या पाश्र्वभूमीवर आता याच मतदारसंघातील सहकाराचे क्षेत्र असलेल्या जवळाबाजार बाजार समितीच्या निवडणुकीची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. या बाजार समितीवर शिवसेनेची सत्ता होती. आजमितीला प्रशासकाची नियुक्ती आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समिती निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रारूप मतदारयादीची घोषणा केली. या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात वसमत व औंढा तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे. तसेच सोसायटी मतदारसंघात एकूण ८ सेवा संस्थाचा समावेश असून, व्यापारी मतदारसंघात ४१७ व्यापाऱ्यांचा समावेश प्रारूप मतदारयादीत करण्यात आला आहे.
२५१ हमाल सभासदांचा हमाल मतदारसंघात समावेश आहे. एकूण ८८ ग्रामपंचायत प्रतिनिधी ग्रामपंचायत मतदारसंघातून मतदान करणार आहेत. सहकार खात्याने पहिल्या टप्प्यात प्रारूप मतदारयाद्यांची घोषणा केल्याने निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. लवकरच प्रारूप मतदारयाद्यांतील मतदारांच्या नावासंबंधीचे आक्षेप त्यावरील सुनावणी होऊन मतदारयादी अंतिम होताच निवडणूक कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जवळाबाजार बाजार समितीची निवडणूक आमदार डॉ. मुंदडा यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यांचे समर्थक माजी सभापती अंकुश आहेर यांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकीत बाजी मारली होती. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांवर विविध कारणाने प्रशासक नेमण्यात आल्यानंतरही जवळाबाजार समितीवर प्रशासक नेमण्याऐवजी त्यांना मुदतवाढ मिळाली होती. ती संपल्यामुळे प्रशासक नियुक्त केला असला, तरी अंकुश आहेर हे गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
वसमत विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेली प्रत्येक निवडणूक गाजली. कधी राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची, कधी भाजप राष्ट्रवादी एकत्र, औंढा नगरपंचायतमध्ये भाजप-शिवसेना एकत्र या एकूण घडामोडीमुळे जवळाबाजार बाजार समितीच्या निवडणुकीत कोण कोणासोबत जाणार, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. दोन जयप्रकाशचे गट वेळोवेळी आमने-सामने उभे टाकतात. यापूर्वी जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँकेची निवडणूक एक आठवडय़ानंतर जाहीर होणार असल्याने या बँकेच्या निवडणुकीकडेसुद्धा संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे.