30 September 2020

News Flash

मास्क तयार करून एचआयव्हीबाधित मुलांकडून समाजभान

करोनाबाधितांना ‘एचआयव्ही’ बाधितांना लागू पडणारी औषधे दिली जात आहेत.

संग्रहित छायाचित्र

सुहास सरदेशमुख

ज्यांना माहीत नाही आपलं आयुष्य किती दिवस? एचआयव्हीची लागण झाल्याने आईवडील गेलेले. अशा ८५ मुलांबरोबर राहणारे रवी बापटले यांच्यासमवेत राहणारी ही मुले आता करोना संकटात समाजाची मदत करण्यास पुढाकार घेत आहेत. हातमोजे घालून तसेच पूर्ण स्वच्छतेची काळजी घेत ते मास्क बनवीत आहेत. दररोज ५०० हून अधिक मास्क तयार करत आहेत. समाजाच्या सहकार्याने सुरू असणाऱ्या या प्रकल्पांमध्ये सध्या दीड-दोन महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा आहे. मात्र, परिस्थिती चिघळली तर अडचणी वाढू शकतील. बीड जिल्ह्य़ातील दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांच्या प्रकल्पातही अशीच स्थिती आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एचआयव्ही आणि गतिमंद मुला-मुलींच्या प्रकल्पात विशेष काळजी घेतली जात आहे. या प्रकल्पावर नवा माणूस येणार नाही, याची काळजी घेतली आहे. या मुलांची प्रतिकारशक्ती आधीच कमी असते. त्यामुळे अधिक स्वच्छता पाळली जात आहे. उस्मानाबाद येथे १३० हून अधिक अनाथ आणि गतिमंद मुलींचा सांभााळ करणारे शहाजी चव्हाण सांगत होते. आमच्या कर्मचाऱ्यांना रोज प्रकल्पावर येणे भाग आहे.

मात्र, ते दररोजच स्वच्छतेची काळजी घेत असतात. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. सतत हात धुणे, ही सवय लावून घेतली जात आहे. आता दोन वेळा मुलींच्या आरोग्याबाबतचे अहवाल राज्य सरकारला पाठविले जात आहेत. राज्यातील बालगृहांमध्येही अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला व बालकल्याण आयुक्तांनी कोणी आजारी असल्यास तातडीने आरोग्य विभागास कळवावे असे सुचविले आहे.

करोनाबाधितांना ‘एचआयव्ही’ बाधितांना लागू पडणारी औषधे दिली जात आहेत. सध्या या औषधांचा पुरेसा साठा असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांची काळजी घेणारे मराठवाडय़ातील या क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते आता अधिक सतर्क झाले आहेत. रवी बापटले म्हणाले, ‘‘आम्ही तर काळजी घेतच आहोत; पण त्याचबरोबर मुलांकडून मास्क बनविण्याचे कामही करून घेत आहोत. त्यामुळे त्यांचा वेळही चांगला जातो आणि आपणही समाजाच्या उपयोगी पडू शकतो, अशी भावना निर्माण होते.’’ गेले काही दिवस ‘मास्क’ बनविण्यासाठी पुरेसे कापड नव्हते. आता ते उपलब्ध झाले असल्याने हे काम नव्याने जोमात सुरू करण्यात आले आहे.

धान्याचा आढावा घ्यावा

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सुविधा वगळता सारे काही बंद करण्याच्या निर्णयामुळे सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने मोफत किराणा देण्यासाठी एकत्रित मोठय़ा प्रमाणात खरेदी होत आहे. तसेच टाळेबंदी किती दिवस असेल याचा आढावा घेत किराणा अधिकचा भरला जात असल्याने किराणा मालाचा तुटवडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागातील या प्रकल्पातील किराणा आणि धान्याचा आढावा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. दोन महिन्यांपर्यंतचे धान्य असले तरी एचआयव्ही आणि गतिमंद मुलींच्या प्रकल्पात पोषणमूल्य वाढेल, असे पदार्थ दिले जावेत, अशी मागणीही केली जात आहे.

फार अडचण जाणवणार नाही. महिना-दीड महिना पुरेल एवढे धान्य आणि किराणा नक्की आहे. मात्र, त्यानंतर या प्रकल्पाकडे अधिक काळजीचे पाहण्याची गरज आहे. सध्या कोणी विद्यार्थी आजारी नाहीत.

– शहाजी चव्हाण, उस्मानाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 12:45 am

Web Title: masks made by hiv infected children abn 97
Next Stories
1 राज्यातील विजेची मागणी सरासरी साडेपाच हजार मेगावॅटने घटली
2 मराठवाडय़ात १५ हजार परप्रांतीय अडकले
3 औरंगाबादकरांच्या दारी, भाजीपाल्यासह धान्य-फळांची शिदोरी
Just Now!
X