लायन्स व लिओ क्लब ऑफ मीरा भाइंदर (मुंबई), तसेच लातूर लायन्स फॅमिलीच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमास दररोज २० लिटरचे दहा पाण्याचे जार व महिन्यातून दहा पाण्याचे टँकर मोफत दिले जाणार आहेत.
पंजाबमधील खालसा अ‍ॅड या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने लातूर शहरात दररोज १ लाख लिटर पाणी टँकरने वितरित केले जात आहे. पायलट, वकील, अभियंते असलेले या संस्थेचे प्रतिनिधी पाणी वितरणासाठी शहरात ठाण मांडून आहेत. संपूर्ण मे महिना लातुरात पाणी वितरणाचे काम केले जाणार असल्याचे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अमरसिंह सिंघ यांनी सांगितले. शहरातील बोधेनगर, रमाबाई आंबेडकर चौक, कृपासदन रस्ता, बरकतनगर, विलासनगर, गाजीपूर अशा भागात गेल्या सहा दिवसांपासून टँकरद्वारे पाणी वितरित केले जात आहे. दर आठ दिवसांनी पाणी वितरण करणारी वेगळी टीम लातुरात दाखल होते, ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आहे, त्या त्या ठिकाणी आपण काम करत असल्याचे सिंग यांनी सांगितले. लातूरची मंडळी चांगली आहेत. एका दुकानात पाण्याची बाटली घेण्यासाठी गेलो असता त्यांनी पसे घेतले नाहीत. तुम्ही लोकांना मोफत पाणी देता, मी केवळ एक बाटली दिली तर काय बिघडले, असा प्रश्न त्या दुकानदाराने केला. संकटात धावून येणे हे आपले काम आहे या जाणिवेतून आपल्या संस्थेच्या वतीने पाणीवाटप करत असल्याचे ते म्हणाले.
चाकूर तालुक्यातील हणमंतवाडी गाव शासकीय कर्मचाऱ्यांनी दत्तक घेतले. गावातील २०० कुटुंबांना जारचे मोफत पाणी वितरित केले जात आहे. ‘मदतीचा हात’ या नावाने व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांसह सुमारे १२ सनदी अधिकारी व ३९ शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. अष्टविनायक प्रतिष्ठान व दयानंद शिक्षण संस्थेच्यावतीनेही लातूर शहरात मोफत जारचे वितरण केले जात आहे. याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. मन्मथ भातांब्रे, विनोद कुचेरिया, डॉ. महेश देवधर, मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते.