सिल्लोड व फुलंब्री तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काही मध्यम प्रकल्पांना गळती लागली आहे. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तर वाहूनच गेले. १९ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. लहुकी या मध्यम प्रकल्पास गळती लागली. त्यातून किती पाणी वाहून जाईल, हे लगेच सांगता येणार नाही. सध्या बंधारा ओसंडून वाहत आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीचे पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांना हंगामी पसेवारीच्या आधारे मदत करावी, पुरात वाहून गेलेल्या ठिबक संचाचा मोबदला द्यावा, ढासळलेल्या विहिरी नव्याने मंजूर कराव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले.
अतिवृष्टीने सिंचन प्रकल्पांनाच गळती लागली असल्याचे लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी सांगतात. गेल्या १२ वर्षांत जे प्रकल्प भरले नव्हते, अशा प्रकल्पांत पाणी आल्याने अनेक प्रकल्पांची गळती लक्षात आली. इनायतपूर व निलजगाव येथील गळती बंद करण्यात आली. मात्र, लहुकी येथील गळती सध्या बंद करणे तसे अवघड असल्याचे कार्यकारी अभियंता बी. आर. िशगाडे यांनी सांगितले.
लहुकी प्रकल्प ७३ टक्के, तर पूर्ण नेलपूर, खेळणा, गडदगड हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तब्बल १९ लघुप्रकल्पही भरले आहेत. अनेक प्रकल्पांना गळती लागल्याचे समजल्याने त्याच्या डागडुजीसाठी प्रयत्न केले जात आहेत. १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान कालवा सल्लागार समिती गठित करुन गावागावांत उपलब्ध पाण्याचा कसा उपयोग करावा, याची माहिती दिली जाणार असल्याचे िशगाडे यांनी सांगितले.