मराठवाडय़ावर कधी नव्हे ते अभूतपूर्व संकट ओढवले असून मराठवाडय़ाचा विकास थांबला आहे. मराठवाडय़ाच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बठक घेऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
लातूर जिल्हय़ातील अहमदपूर येथे एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख एका व्यासपीठावर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायक पाटील व माजी आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, की निवडणुकीतील हार-जीत या पलीकडे जाऊन जे सत्तेत आहेत. त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे. दुर्दैवाने राज्य-केंद्रातील सरकार प्रश्न सोडवण्यासाठी काही करीत नाहीत. वीज, पाणी या मूलभूत प्रश्नांकडेही सरकार डोळेझाक करीत आहे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, वर्षभरात अडीच हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. सरकारच्या नाकत्रेपणामुळे मराठवाडय़ाचा विकास खुंटला असून, या प्रश्नाला वाचा फोडण्यास सर्वपक्षीय बठक घेऊन राज्यपालांना शिष्टमंडळासह साकडे घालणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार देशमुख यांनी नांदेड-लातूर रस्त्यावरील खड्डय़ांचा उल्लेख करीत हा मार्ग लवकर दुरुस्त व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. सत्तेत कोणीही असले तरी जनतेचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या मार्गावरील लोहा-कंधार मतदारसंघातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर शिवसेनेचे असले, तरी पूर्वाश्रमीचे विलासरावनिष्ठ आहेत. अहमदपुरात आमदार विनायक पाटील हे अपक्ष निवडून आले असले, तरी तेही पूर्वाश्रमीचे विलासरावनिष्ठच आहेत. त्यामुळे अमित देशमुखांनी आपल्या समर्थकांनाच हा सल्ला दिला. हा सल्ला शिरसावंद्य मानून ते किती समर्थपणे काम करतात याकडे आता लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांनी मात्र या कार्यक्रमात राजकीय भाष्य करण्याऐवजी मुलांवरील संस्कार, चारित्र्य या विषयावर बोलणे पसंत केले.