औरंगाबाद : घराशेजारी राहणाऱ्या मुलीला कपडे बदलताना पाहिल्यावरून वाद झाल्यानंतर माथेफिरू तरुणाने पहाटे तीनच्या सुमारास घर पेटवून दिले. हा खळबळजनक प्रकार मुकुंदवाडीतील संजयनगरात घडला. एक दिवस अगोदर झालेल्या भांडणातून शेजारी राहणाऱ्या तरुणाने घर पेटविल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

जालन्यातील नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी संजयनगरातील कुटुंब गेले होते. १५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांची मुलगी कपडे बदलत होती. तिला कपडे बदलताना शेजारी राहणारा तरुण पाहत होता. त्यावरून त्या कुटुंबात आणि तरुणात वाद झाला. हा वाद वाढू नये यासाठी जावयाने या घरातील कुटुंबीयांना त्याच्या बहिणीकडे राहायला पाठवले. त्यानंतर १६  फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास घराला अचानक आग लागली. हा प्रकार पाहून घरमालकाने कुटुंबीयांशी संपर्क साधला. तसेच घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी घराच्या दिशेने धाव घेतली. पण तोपर्यंत घरगुती साहित्य व कपाटातील दीड लाखांची रोकड (दोन हजारांच्या ७५ नोटा) जळून खाक झाली होती. याप्रकारानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.