औद्योगिक प्राणवायू वापराचा संबंध नसल्याचा निर्वाळा

औरंगाबाद : शहरात दिवसेंदिवस म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत ७८९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. पण काळया बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. औद्योगिक वापरातील प्राणवायू टाक्या वापरल्यामुळे असे घडत असावे अशी चर्चा सुरू असली तरी त्याला कोणताही आधार नसल्याचे डॉक्टर आवर्जून सांगत आहेत. शहरात सध्या ३२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण आजारातील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या ‘लायपोझोमल अ‍ॅम्फोटेरिसिन-बी’ इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे.

मेंदूपर्यंत बुरशी गेली असेल तर या इंजेक्शनचा वापर केला जातो. मात्र, बुरशी नियंत्रणासाठीही हे इंजेक्शन वापरण्यात येत आहे. दरम्यान, हा रोग औद्योगिक क्षेत्रातील प्राणवायूच्या टाक्यांमुळे वाढत असल्याची चर्चा सुरू झाली असली तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. हा रोग कोणत्या कारणामुळे होतो, यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. अनेकांना प्राणवायू लावावा लागला नाही आणि काहींना स्टेरॉईड औषधेही दिली गेली नाहीत अशा करोनामुक्त व्यक्तींनाही या रोगाने ग्रासलेले आहे. त्यामुळे औद्योगिक वापरातील सिलिंडरमुळे म्युकरचा प्रसार वाढत असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगण्यात  येत आहे. वेळेला जो मिळेल तो प्राणवायू वापरणे महत्त्वाचे असते. या काळात अनेक गोळयांचा वापर अचानकपणे वाढविण्यात आला. त्यात झिंकचा अतिरिक्त वापर हेही कारण असू शकते असे काही डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे यावर संशोधन हाती घेतले जावे अशी मागणी होत आहे. मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना रेमडेसिविर आणि स्टेरॉईड इंजेक्शन दिले असतील तर त्या नागरिकांनाही म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असतो.