पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची सूचना

औरंगाबाद : नियोजित १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळांना मीटर बसविण्याचा समावेश करावा, अशी सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

राज्य सरकारने शहरासाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवली जाणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना पाणीपट्टीचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. जेवढे पाणी वापरले जाईल तेवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे. त्यामुळे जे ग्राहक जास्त पाणी वापरतील त्यांना जास्त पाणीपट्टी येईल. सुरुवातीला नवीन पाणीपुरवठा योजनेच्या डीपीआरमध्ये नळांना मीटर बसविण्याची तरतूद करण्यात आलेली नव्हती, ती केली जावी अशी सूचना करण्यात आली आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १३०८ कोटींची निविदा काढली असून चार कंत्राटदार एजन्सीच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी-हैदराबाद, मेघा इंजिनीअरिंग कंपनी-मुंबई, जीबीपीआर इंजिनीअरिंग कंपनी-मुंबई, उत्तर प्रदेश जलनिगम कंपनी-  नोएडा या चार एजन्सींच्या निविदांची तांत्रिक निविदा उघडण्यात आली.